सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार चाकूने वार करणाऱ्या आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही. हा आरोपी कोण आहे? त्याचं नाव काय? याची माहितीही पोलिसांना मिळालेली नाही. आज तिसऱ्या दिवशीही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे आलेले नाहीत. पोलिसांचे 35 पथक या चोराच्या मागावर आहेत. पण चोराचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. हा चोर गुजरातला पळाल्याची चर्चा होती. पोलीस तिकडेही तपास करत आहेत. त्यानंतर हा चोर मध्यप्रदेशात लपल्याची खबर मिळताच पोलीस या चोराचा पाठलाग करत करत मध्यप्रदेशात गेले आणि एकाला ताब्यात घेतलं आहे. पण तोच चोर आहे की त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती आहे हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेशातून एकाला घेतलं ताब्यात घेतलं आहे. पण ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. खरा आरोपी पकडला की चोरा सारखा दिसणारा व्यक्ती पकडला हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. काल पोलिसांनी शाहीद नावाच्या एका तरुणाला पकडलं होतं. सैफवर हल्ला करणाऱ्या सारखाच तो दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पण चौकशीत तो चोर नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला पोलिसांनी सोडून दिलं. त्यामुळे मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलेला व्यक्तीच चोर आहे की नाही हे अद्याप उलगडलेलं नाही.
लोकेशन ट्रेस, पण…
सैफवर झालेल्या हल्ल्याला तीन दिवस झाले आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांचे 35 पथके यासाठी काम करत आहेत. चोराचं लोकेशन ट्रेस केलं जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याचा फोटोही पोलिसांनी मिळवला आहे. चोराचा फोटो सार्वजनिक करण्यात आला आहे. मात्र तरीही पोलिसांना अद्याप चोर सापडलेला नाही. किंवा चोराची काहीच माहिती मिळालेली नाही. तो कुठे राहतो, काय करतो? तो मुंबईचाच आहे का? आदी माहिती अद्यापही पोलिसांना मिळाली नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या चोराच्या कुटुंबातील कुणीही समोर येऊन काहीही भाष्य केलेलं नाही.
वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही
चोराची अधिकाधिक माहिती मिळावी म्हणून वांद्रे परिसरातील सीसीटीव्हीचा वेगवेगळ्या कोनातून तपास केला जात आहे. वांद्रे पोलिसांचे पथक डीव्हीआर मशीनद्वारे तपास करत आहेत. मुंबई क्राईम ब्रँच आणि पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत आणि या संदर्भात पोलीस डीव्हीआर मशीन थेट पोलीस ठाण्यात आणून तपास केला जात आहे.
करीनाचा जबाब
दरम्यान, अभिनेत्री करीना कपूरने या प्रकरणी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. करिनाच्या घरातील नोकरचाकरांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. या जबाबाच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. हा आरोपी दादरला दिसल्याचंही एका सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. काल त्याचं लोकेशन प्रभादेवी दाखवलं जात होतं.