छगन भुजबळ रुग्णालयातून विशेष विमानाने नाशिकमध्ये:मुख्यमंत्र्यांच्या विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित

2 hours ago 1
मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार असल्यामुळे भुजबळ रुग्णालयातून विशेष विमानाने नाशिकमध्ये आले. येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते पुन्हा उपचार घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत. नाशिक शहरातील त्र्यंबकरोड येथे दूध डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या मुलांसाठी वसतीगृह, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि सारथी आदी संस्थांच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक शहरातील गंगापूररोड पंपिंग स्टेशन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडणाऱ्या स्मृती उद्यानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे सत्कार करण्यात येणार आहे. फुलेंच्या अर्धाकृती शिल्पाचे लोकार्पण नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझच्या शिल्पाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, दादा भुसे, गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम पार पडल्यानंतर छगन भुजबळ पुन्हा उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळांना रुग्णालयात केले होते दाखल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची दोन दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने विशेष विमानाने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुण्यात असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. पुण्याहून विशेष विमानाची सोय करत त्यांना थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरू असून त्यांना नेमके काय झाले होते, हे समजू शकले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भुजबळ यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. तसेच ठिकठिकाणी ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू होते, त्यासाठी देखील त्यांना भेटी द्याव्या लागत होत्या. यामुळे कदाचित त्यांना थकवा आला असू शकतो, असे म्हटले जात होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article