Published on
:
03 Feb 2025, 11:54 pm
Updated on
:
03 Feb 2025, 11:54 pm
लंडन : मानवाचा चेहरा असलेली म्हणजेच ‘ह्युमन पोर्ट्रेट’ असलेली सर्वात जुनी वस्तू इसवी सनापूर्वीच्या 24 हजार वर्षांपूर्वीची म्हणजेच एकूण 26 हजार वर्षांपूर्वीची आहे. हस्तीदंतावर कोरलेला एक मानवी चेहरा यामध्ये पाहायला मिळतो. या चेहर्यातील डोळे जणू काही आपल्याकडे रोखूनच पाहत आहेत, असे दिसतात. या वस्तूला ‘डोल्नी वेस्टोनीस पोर्ट्रेट हेड’ म्हणतात. पाषाणयुगातील ही कलाकृती त्या काळात एखाद्या व्यक्तीचा चेहरा कलाकृतीच्या रूपात आणण्याचा सुरुवातीचा प्रयत्न होता.
झेक प्रजासत्ताकच्या साऊथ मोरावियन भागात ही वस्तू सापडली होती. तेथील डोल्नी वेस्टोनीस या साईटवरील उत्खननावेळी ही हस्तीदंती कलाकृती 1920 च्या दशकात मिळाली. हे जगातील सर्वात जुने असे मानवाचे सुरक्षित राहिलेले पोर्ट्रेट असल्याचे म्हटले जाते. 26 हजार वर्षांपूर्वीची ही मानवी चेहरा असलेली हस्तीदंती कलाकृती आजही कुतूहलाचा विषय आहे. विशेष म्हणजे हा मानवी चेहरा हत्तीच्या सुळ्यावर दगडी अवजारांनीच कोरलेला आहे. हा चिमुकला चेहरा केवळ 1.9 इंचाचा म्हणजेच 4.8 सेंटीमीटर उंचीचा आणि 1 इंच रुंदीचा म्हणजे 2.4 सेंटीमीटर रुंदीचा आहे. हा चेहरा एका स्त्रीचा आहे. तिचे डोळे मोठे, खळी असलेली हनुवटी, फुगीर नाक आणि तोंड आहे. तिने डोक्यावर कसले तरी आच्छादन घेतले असावे, ज्याखाली तिचे केस आहेत. हा एखाद्या विशिष्ट महिलेचाच चेहरा असावा, सर्वसाधारण मानवी चेहर्याची ही कलाकृती नसावी, असे संशोधकांना वाटते. अपर पॅलिओलिथिक काळात या भागामध्ये मॅमथ हत्तीची शिकार करणार्या लोकांचा एक समूह राहत होता. या वसाहतीला कधी कधी ‘स्टोन एज पोम्पेई’ असे म्हटले जाते. याठिकाणी अन्य युरोपियन भागांच्या तुलनेत पाषाणयुगातील अनेक कलाकृती सापडलेल्या आहेत.