Published on
:
20 Nov 2024, 11:31 pm
Updated on
:
20 Nov 2024, 11:31 pm
अभय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय अभ्यासक
जगातील सर्वांत बलाढ्य बहुराष्ट्रीय संघटना असणार्या जी-20 संघटनेच्या ब्राझीलमधील वार्षिक परिषदेमध्ये यंदा जाहीर केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात जागतिक नेत्यांनी उपासमारीविरोधात लढण्यासाठी एक जागतिक करार केला. जगातील प्रमुख देशांनी भूकबळी संपुष्टात आणण्याचा निर्धार करत ऐक्य दाखविण्याची घोषणा केल्यामुळे आगामी काळात स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म ही भारतीय संस्कृतीची हजारो वर्षांपासूनची शिकवणूक आहे. कारण अन्नाविना मानवी आयुष्याची कल्पनाच करता येणार नाही. प्रत्येक व्यक्ती दोन वेळच्या अन्नासाठी आयुष्यभर झगडत असते. मग तो एखाद्या कंपनीचा सीईओ असो किंवा एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा मजूर. असे असूनही आज जगाने फाईव्ह जी, सिक्स जीचा वेग गाठलेला असताना भूक निर्देशांकात मात्र चिंताजनक स्थिती आहे. ज्या वेगाने जगाने आधुनिकता, तंत्रज्ञान आणि झगमगटाचा अंगीकार केला, त्याच वेगाने जगातील गरिबी, भूकबळीसारख्या समस्यांवर प्रहार केले असते तर जगाचे चित्र वेगळेच दिसले असते. आता उशिरा का होईना, ब्राझीलमध्ये झालेल्या जी-20 शिखर संमेलनात जगातील 20 आघाडीच्या देशांनी एकत्र येऊन जागतिक भूकबळीची समस्या सोडविण्याची घोषणा केली. ब्राझीलचे अध्यक्ष लुला डा सिल्वा यांनी जी-20 या जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या शिखर संमेलनाची सुरुवात करताना उपासमार आणि गरिबीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. या निर्णयाला 80 पेक्षा अधिक देशांनी पाठिंबा दिला आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धोरणात्मक बदल करण्याचा मुद्दा मांडलेला असताना ब्राझीलने जी-20 मध्ये घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वास्तविक उपासमार आणि गरिबी हे नैसर्गिक आपत्तीचे परिणाम नसून ते चुकीच्या राजकीय निर्णयप्रक्रियेचे आणि धोरणांचे परिणाम आहेत. जगात सध्या दरवर्षी सहा अब्ज टन अन्नधान्यांचे उत्पादन होत असताना लोकसंख्येचा मोठा भाग दोनवेळच्या पुरेशा अन्नापासून वंचित आहे. म्हणून झगमगाटात न्हाऊन निघणार्या दुनियेत गंभीर रूप धारण करणारी गरिबी आणि उपासमार ही अस्वस्थ करणारी ठरत आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (जीएचआय) हा जागतिक, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावर उपासमारीच्या स्वरूपाचे आकलन करणे आणि त्यावर लक्ष ठेवण्याचे एक माध्यम आहे. यात कुपोषण, कुपोषित बालके, मुलांच्या सर्वांगीण विकासातील अडथळे आणि बालमृत्यू याचा समावेश आहे. ‘जीएचआय’चा एकूण स्कोअर शंभर गुण असतो आणि त्या आधारावर कोणत्याही देशातील उपासमारीचे गंभीर चित्र मांडले जाते. म्हणजेच एखाद्या देशाचा स्कोअर शून्य असेल तर त्याची चांगली स्थिती आहे अणि एखाद्याचे गुण शंभर असतील तर ती गंभीर स्थिती मानली जाईल. भारताचा स्कोअर 29.1 आहे. हे गुण गंभीर श्रेणीत मोडतात. याशिवाय आघाडीच्या 17 देशांचे गुण पाचपेक्षा कमी आहेत. या देशांत चीन, तुर्किए, कुवैत, बेलारूस, उरुग्वे आणि चिलीसारख्या देशांचा समावेश आहे. त्याचवेळी मुस्लिमबहुल देशाच्या स्थितीचा विचार केला तर यूएई 18, सौदी अरब 30 व्या स्थानावर आहे. जगातील एकूण उपासमारीच्या स्थितीचा विचार केला तर ती अलीकडच्या काळात स्थिर राहिलेली आहे. पण स्थिती अजूनही वाईटच आहे.
2022 च्या अहवालात संपूर्ण जगातील समस्यांचा विचार केला असता उपासमारीच्या स्थितीला मधल्या श्रेणीत ठेवण्यात आले. 2014 मध्ये जगाचा एकूण स्कोअर 19.1 असताना आता तो 2022 मध्ये कमी होत 18.2 झाला आहे. या अहवालात सामील असलेल्या 44 देशांची स्थिती अत्यंत बिकट आहे. या देशांतील रहिवाशांना दोन वेळचचे अन्नही नशिबात नाही. भारतात कोरोना काळात हातावर पोट असणार्या कष्टकरी, कामगार, मजूर, विक्रेते, छोटे व्यावसायिक यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे राहिले. या काळात केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेतून गरीब, वंचित वर्गाला दरमहा पाच किलो गहू, तांदूळ, डाळी मोफत दिले. हे स्वागतार्ह होते. पण ते पुरेसे नव्हते. जनतेला अन्नधान्य पुरवठा करणे म्हणजे कुपोषण नाहीच, असा अर्थ नाही. या पुरवठ्याचा महासाथीच्या काळात लोकांना जिवंत राहण्यासाठी उपयोग झाला. पण पोषणयुक्त आहार पुरेसा मिळाला नाही. त्यामुळे भुकेचा प्रश्नच नाही, असे म्हणता येणार नाही.
अभ्यासकांच्या मते, दरडोई उत्पन्न हे राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे मानक असते, तसे जागतिक भूक निर्देशांक हा लहान मुले, माता व एकूण राष्ट्राच्या पोषणाचे प्रमुख मानक ठरते. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2023 मध्ये 28 कोटींपेक्षा अधिक लोकांनी भूकबळीचा सामना केला. यात सर्वाधिक वाईट स्थिती ही गाझातील नागरिकांची असून तेथे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या पाच विशेष संस्थांनी प्रकाशित केलेल्या जागतिक खाद्य सुरक्षा आणि पोषण स्थितीच्या नव्या अहवालानुसार 2023 मध्ये सुमारे 733 दशलक्ष लोक उपाशी किंवा अर्धपोटी राहिले. म्हणजेच जागतिक पातळीचे आकलन केल्यास प्रत्येक अकरा व्यक्तींमागे एक व्यक्ती आणि आफ्रिकेत प्रत्येक पाच माणसामागे एक व्यक्ती उपाशी राहताना दिसते. आता जी-20 देशांनी गरिबी आणि भूकबळी संपुष्टात आणण्याचा निर्धार करत ऐक्य दाखविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.