Published on
:
22 Jan 2025, 12:01 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:01 am
अनिल पाटील, प्रवर्तक, एस पी वेल्थ, कोल्हापूर
तरुणांनी आयुष्यात मोठा पैसा निर्माण करण्यासाठी मोठा पैसा देण्याची गरज नसते. इथे मोठा पैसा निर्माण करण्यासाठी मोठा वेळ द्यावा लागतो. चक्रवाढ ही अशी प्रक्रिया आहे जिथे तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर परत परतावा मिळतो. पैशाला पैसा जोडला जातो.
आजच्या तरुणाच्या हातात जेव्हा जेव्हा पैसा येतो तेव्हा त्यांच्या इच्छा प्रबळ होतात. गरज नसताना त्यांची गाडी, मोबाईल आणि चैनीखोर प्रवृत्ती बळावते आणि भविष्यातील गरजांसाठी गुंतवणूक करावी हा विचार मागे पडतो. आयुष्यातला महत्त्वाचा काळ हा गुंतवणूक न करता वाया गेल्याने प्रचंड मोठे नुकसान होते. ही गोष्ट त्याला कळतच नाही. जर आजचा तरुण सुज्ञपणे, डोळसपणे योग्य ठिकाणी, पहिल्या दिवसापासून गुंतवणूक करेल तरच त्यांचे भविष्य समृद्ध आणि श्रीमंत बनेल आणि देश आर्थिक बलशाली बनेल. यासाठी गुंतवणुकीतील वेळेचे महत्त्व हा नियम जाणून घेतला पाहिजे. वॉरेन बफेट यांनी चक्रवाढ व्याजाची ताकद समजून घेतली. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी भांडवली बाजारात गुंतवणुकीसाठी सुरुवात केली. आज त्यांची 12 लाख कोटींची संपत्ती निर्माण करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख झाली आहे.
गुंतवणुकीची शक्ती : लवकर का सुरू करावी?
चक्रवाढ शक्तीची महती फार मोठी आहे. इथे वेळ फार महत्त्वाचा असतो. आपण जितका मोठा वेळ देतो तितका मोठा पैसा निर्माण होतो. तरुणांनी आयुष्यात मोठा पैसा निर्माण करण्यासाठी मोठा पैसा देण्याची गरज नसते. इथे मोठा पैसा निर्माण करण्यासाठी मोठा वेळ द्यावा लागतो. चक्रवाढ ही अशी प्रक्रिया आहे जिथे तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर परत परतावा मिळतो. पैशाला पैसा जोडला जातो. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तितका तुमचा पैसा वाढायला जास्त वेळ मिळतो.
आजच्या तरुणांकडे संपूर्ण आयुष्य पडलेले असते. इथे गुंतवणुकीला मोठा वेळ असतो. ही फार मोठी संधी असते. त्याचा फायदा करून घेण्यासाठी गुंतवणूक लवकर सुरू करणे गरजेचे असते. त्यासाठी खालील उदाहरण पाहूया...
एकाच वर्गातील तीन मित्र असतात. अजय, विजय आणि संजय. तिघांचे करिअर सुरू झाले. अजयच्या वडिलांना भांडवली बाजाराचा अभ्यास असल्याने त्यांनी अजयला वयाच्या 24 व्या वर्षी पगाराची सुरुवात झाल्यापासून दर महिन्याला गुंतवणुक करण्यास सांगितले. हाच विचार विजय आणि संजय यांना पण दिला, पण हा विचार दोघांनी धुडकावून लावला. ‘गुंतवणुकीसाठी संपूर्ण आयुष्य पडलेले आहे, लगेच गुंतवणूक सुरू करण्यापेक्षा आपण थोडीशी मौजमजा करू आणि मगच नंतर गुंतवणूक सुरू करू’ या विचाराने नंतरच्या दहा वर्षांनंतर अजय पेक्षा दुप्पट रकमेने विजयने गुंतवणुकीची सुरुवात केली. हा विचार संजयला पटला नाही. ‘आजचा दिवस आनंदाने जगायचा, उद्याचे कोणी पाहिले आहे’ हा विचार मनात असल्याने त्याने गुंतवणुकीला प्राधान्य दिले नाही. आयुष्याची संध्याकाळ होताना त्याच्या लक्षात आले. काहीतरी पुंजी असावी, या विचाराने मग वयाच्या 45 व्या वर्षी विजयच्या दुप्पट रकमेने संजयने आपल्या गुंतवणुकीला सुरुवात केली. तिघांच्या वयाच्या साठाव्या वर्षी त्यांचा जर आलेख पाहिला तर गुंतवणुकीमध्ये वेळेचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे हे आपल्याही लक्षात येईल. याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आयुष्यामध्ये किती मोठी चूक करतो आहोत, हे लक्षात येते.
यासाठी खालील उदाहरणाचे निरीक्षण करा
गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बँक, एलआयसी, पोष्ट. यामध्ये कमी परतावा मिळतो. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना परतावा महत्त्वाचा असतो. त्यासाठी एसआयपीद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असता सरासरी 12 टक्के परतावा इथे गृहीत धरला आहे. इथे गुंतवणूक करताना बाजारची जोखीम असते हेही समजावून घेतले पाहिजे. अजयची एकूण गुंतवणूक 21 लाख झाली आणि 3.09 कोटीची संपत्ती निर्माण झाली. याच प्रमाणे पहिले तर आठ रुपये गुंतवणूक करून 92 रुपये व्याजाच्या स्वरुपात संपत्ती मिळविण्यात तो यशस्वी ठरला. विजयने दहा वर्षे उशिरा सुरुवात केली दहा वर्षे उशिरा केल्याने 9.60. लाख रुपये वाचवले. मात्र भविष्यातील एक कोटी 17 लाख रुपयांची उशिराची किंमत मोजावी लागली. संजयचा आढावा घेतला असता 38 लाख रुपये भरून फक्त 1.09 कोटी रक्कम मिळाली. याचे प्रमाण पहिले तर चाळीस रुपये भरल्यानंतर संजयला फक्त 60 रुपये व्याजाच्या स्वरूपात पैसे मिळाले. तिघांचा अभ्यास केला असता अजय ने वयाच्या लवकर गुंतवणूक सुरु करून कमी रकमेमध्ये मोठी संपत्ती निर्माण केली आहे. या गोष्टीचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. जेव्हा तुम्ही हुशारीने दीर्घकाळ गुंतवणूक करता तेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो. तुम्हाला पैशासाठी काम करण्याची गरज भासत नाही. जीवनात श्रीमंती मिळविण्यासाठी एक वॉरंट बफेटची आर्थिक नीती आणि दुसरी भारताची वाढती अर्थव्यवस्था या दोन गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत . यासाठी आर्थिक साक्षर झाले पाहिजे. बॉण्ड मार्केट, शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. खिशात शंभर रुपये मिळाले तर 30 ते 40 टक्के रक्कम गुंतवणूक करा. करिअर चालू झाल्याबरोबर कुटुंबातील खर्चाची जबाबदारी नसते. अशावेळी भविष्यातील गुंतवणुकीसाठी वाव दिला पाहिजे.