जिल्हाधिकारी कार्यालयांचा कारभार पूर्णपणे ऑनलाइन
Published on
:
02 Feb 2025, 3:01 am
Updated on
:
02 Feb 2025, 3:01 am
पुणे: जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागात ई-फाइल्सच्या माध्यमातून 100 टक्के ऑनलाइन काम सुरू झाले आहे. दुसरीकडे प्रांत, तहसील आणि मंडल कार्यालयात ई-ऑफिसचे काम प्रलंबित आहे. या कार्यालयातील ई-ऑफिसचे कामकाज लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
ऑक्टोबर 2024 जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, ती पूर्ण क्षमतेने सुरू झाली नव्हती.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ई-ऑफिसनुसार सर्व विभागांनी कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व विभागांमध्ये ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून ई फाइल्सनुसार काम सुरू झाले आहे. ई-ऑफिसमध्ये कोणतीही फाइल काही मिनिटांत शोधणे शक्य होणार आहे. मात्र, तहसीलदार, प्रांत कार्यालयांमध्ये ई-ऑफिसचे काम रखडले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती आवक-जावकसह सर्व विभागांमध्ये ’ई- ऑफिस’ प्रणाली राबविली जात आहे. त्यासाठी संगणक, उच्च क्षमतेचे (हायस्पीड) स्कॅनरच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ई-ऑफिसचे राष्ट्रीय सूचना केंद्राकडून (एनआयसी) चांगली संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे
कोणत्याही फाइल्सचा प्रवास एका विभागातून दुसर्या विभागाद्वारे जिल्हाधिकार्यांपर्यंत प्रवास होतो. त्या फाइल्सला पूर्वी ट्रॅक ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची किंवा प्रकरणाची फाइल कोणत्या कारणास्तव, कोणाकडे, कोणत्या विभागाकडे प्रलंबित आहे हे कळत नव्हते. ई ऑफिसमुळे कोणत्या विभागाकडून कोणता प्रस्ताव आला आहे.
तो कोणाकडे आहे हे सहज कळणार आहे. तसेच त्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासन, तहसीलदार तसेच प्रांताकडून कोणती कार्यवाही झाली हे कळणार आहे. परिणामी, फाइल्सवर वेगाने कार्यवाही होऊन प्रकरणांचा निपटारा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लवकरच मिळणार लॉगिन अन् पासवर्ड
जिल्ह्यातील प्रांत, तहसीलदारांना अद्याप लॉगिन आणि पासवर्ड अद्याप प्राप्त झाले नाही. केंद्र सरकारकडे नवीन ई-मेल, पासवर्ड मागणी करण्यात आली असून, लवकरच ते मिळणार आहे. त्यामुळे या विभागाचे कामसुद्धा पुढील काही दिवसांत ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.