झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारतोफा थंडावल्या(file photo)
Published on
:
18 Nov 2024, 2:48 pm
Updated on
:
18 Nov 2024, 2:48 pm
नवी दिल्ली - झारखंड विधानसभा निवडणुकीत निर्णायक मानल्या जात असलेल्या दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबर रोजी ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी सोमवारी प्रचारतोफा थंडावल्या. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात ४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी भाजप, काँग्रेस, झामुमो या प्रमुख पक्षांसह इतर सर्व पक्षांनी जोरदार प्रचार केला.
दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश भाग हा आदिवासीबहुल आहे. या भागावर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे चांगलेच वर्चस्व असल्याचे मानले जाते. मात्र, यावेळेस भाजपने झामुमोचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान या केंद्रीय नेत्यांसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोर लावला. काँग्रेसकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचार केला. तर झामुमोकडून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या जास्तीत जास्त प्रचारसभा झाल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार
दुसऱ्या टप्प्यात झामुमोचे नेते, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कल्पना सोरेन, बसंत सोरेन, महुआ माजी तर काँग्रेसकडून मंत्री इरफान अन्सारी, रामेश्वर ओरआन आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन, सीता सोरेन, बाबूलाल मरांडी, गीता कोडा, सुनील सोरेन हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ , उत्तराखंडमध्ये पोटनिवडणुकीसाठी प्रचार थांबला
उत्तर प्रदेशच्या ९, पंजाबच्या ४, केरळच्या १ विधानसभेच्या जागेवर २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. या सर्व जागांसाठीचा प्रचार सोमवारी थांबला. या सर्व निवडणुकींचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.