Published on
:
24 Jan 2025, 1:05 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:05 am
टेंभुर्णी : जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टेंभुर्णी येथे एका कार्यक्रमात टेंभुर्णी व परिसरात खुलेआम सुरू असलेल्या गौण खनिज वाळू तस्करी विषयी प्रशासनाबाबत वक्तव्य केले होते. याची गंभीर दखल घेत प्रांत अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला. अवैधपणे वाळू वाहतूक करणारा टिपर चार ब्रास वाळूसह जप्त करून तीन जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पुणे-सोलापूर महामार्गावर वरवडे येथे करण्यात आली.
ही कारवाई करून जप्त टिपर हे वाहन पोलीस ठाण्यात आणत असताना प्रांत अधिकारी यांच्या वाहनास फॉर्च्यूनर व अल्कायझर या गाड्या आडव्या लावून रोखण्याचा व कारवाईस अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रांताधिकार्यांना आण्णा पाटील याने हाताने धक्काबुक्की केली आहे. याबाबत आण्णा पाटील (रा.शिराळ (टें) ता. माढा), आप्पा पराडे (रा. बाभळगाव, ता. माळशिरास) व टिपरचा चालक गणेश सोमनाथ काशिद (रा. परीतेवाडी ता.माढा) या तीन जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील जप्त माल वीस लाखांचा एक सहा चाकी बिगर नंबर टिपर,28 हजार रू.किमतीची चार ब्रास वाळू असा एकूण वीस लाख 28 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. 23 जानेवारी रोजी कुर्डुवाडी येथील प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर या अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्यासाठी तलाठी प्रविण बोठे यांच्यासह महसूल विभागाच्या पथकासह जाताना रात्री वरवडे गावाचे शिवारातून त्यांना एक टिपर जाताना दिसला. पथकाने तो टिपर इशारा देऊन थांबविला. त्यात गौण खनिज वाळू दिसून आली. कारवाईसाठी टिपर चालक गणेश काशीद याला टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे घेवून जाताना आण्णा पाटील व आप्पा पराडे यांने त्यांची कार ही आडवी लावुन पोलीस ठाण्यास नेण्यास मज्जाव केला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आण्णा पाटील याने प्रांताधिकारी यांना हाताने धक्काबुक्की केली. याबाबत या पथकातील तलाठी प्रविण किसन बोटे (वय 34) यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तिघांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.