डॉक्टर चीनमध्ये, शस्त्रक्रिया मोरोक्कोत!Pudhari File Photo
Published on
:
28 Nov 2024, 11:36 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:36 pm
शांघाय : जगभरात प्रथमच तब्बल 12 हजार किलोमीटर अंतरावर बसून एका सर्जनने प्रोस्टेट कॅन्सरची सर्जरी केली असून, रोबो तंत्रज्ञानाच्या कक्षा आता कशा विस्तारल्या आहेत, याचा हा उत्तम दाखला मानला जात आहे. फ्रान्सिसी सर्जन डॉ. युनूस अहलाल या शस्त्रक्रियेवेळी चीनमधील शांघाय येथे होते. मात्र, तेथूनच त्यांनी रोबो तंत्रासह मोरोक्कोत असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. चिनी एजन्सी शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, ही आतापर्यंतची सर्वात दूर असताना केली गेलेली पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया आहे.
या शस्त्रक्रियेसाठी चीनमध्ये निर्मित रोबोट टौमोईचा वापर केला गेला. या रोबोच्या माध्यमातून आतापर्यंत 250 हून अधिक लांब अंतरावरील शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. यामध्ये युरोलॉजी, थोरॅसिक सर्जरी आणि गायनोलॉजिकल एंडोस्कोपीसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याला युरोपियन संघाकडून सीई प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. रोबो टौमाई अत्याधुनिक सर्जिकल प्रणालीवर आधारित असून, अव्वल दर्जाचे इमेजिंग आणि रियल टाईम इफिसिएन्सी ही त्याची मुख्य वैशिष्ट्ये ठरत आली आहेत. डॉ. अहलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरोक्कोतील ही शस्त्रक्रिया साधारणपणे दोन तास चालली होती. या कालावधीत रोबोने डॉक्टरांच्या निर्देशानुसार प्रोस्टेट काढत टाकेही घातले. डॉक्टर व रुग्ण यांच्यात 12 हजार किलोमीटर्सचे अंतर असले तरी अद्ययावत ब्रॉडबँडच्या आधारे ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली गेली असल्याचे शिन्हुआने आपल्या वृत्तात म्हटले आहे.