Published on
:
22 Jan 2025, 12:20 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:20 am
दोडामार्ग : साटेली -भेडशी थोरले भरड येथे तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मंगळवारी दुपारी एका परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. संजू नागाप्पा मुकुलकट्टी (38, रा. मुळगाव हिरेकेरूर, जि. धारवाड) असे त्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी तो साथीदारासह गवंडी काम करण्यासाठी तालुक्यात आला होता. दरम्यान त्याचा साथीदार बेपत्ता असल्याची माहिती मुकादमाने पोलिसांना दिली. मृताच्या कपाळावर जखमा दिसून आल्याने हा घातपात आहे की अपघात? अशी चर्चा आहे.
संजू मुकुलकट्टी व त्याचा साथीदार बेपत्ता मंजुनाथ होडागी हे दोघेही सहा महिन्यांपूर्वी खानयाळे येथे गवंडी कामानिमित्त आले होते. ते तेथील एका फार्म हाऊसवर गवंडी काम करीत होत व अन्य साथीदारांसोबत एका खोलीत राहत होते. सोमवारी सायंकाळी दोघेही जेवणा निमित्त साटेली-भेडशी बाजारपेठेत गेले होते. मात्र, उशिरापर्यंत ते रूमवर परतले नाहीत. यामुळे अन्य साथीदारांनी त्याचा शोध घेतला. परंतु, ते कोठेच सापडले नाहीत. मंगळवारी दुपारी शोध घेत असता साटेली- भेडशी थोरले भरड येथे कालव्यातील गेटजवळ बांबूला अडकलेला मृतदेह दृष्टीस पडला. मुकादमाने पोलिसांना याची खबर देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली- भेडशी ग्रामीण रुग्णालयात आणला.
त्याच्या मृत्यूबाबत संभ्रम
मयत संजूचा मृतदेह कालव्यात आढळल्यानंतर अन्य साथीदारांची तारांबळ उडाली. एकाचा मृतदेह पाण्यात सापडला तर दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. मयताच्या कपाळावर जखमा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा मृत्यू पाण्यात पडून झाला की घातपात झाला? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.