Published on
:
24 Jan 2025, 1:00 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:00 am
दोडामार्ग ः तिलारी धरण हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. धरण पूर्ण झाले मात्र भ्रष्ट अधिकारी कालव्याच्या कामात भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यात व्यस्त आहेत. कालवा फुटीचे ग्रहण यामुळेच लागले असून ज्याठिकाणी गेल्या वर्षी दुरुस्ती केली होती त्या उन्नेयी बंधार्याच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळणे हे याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र आता बस्स झाले. यासाठी प्रकल्पाचे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशा आशयाचे निवेदन जि.प.चे माजी समाज कल्याण माजी सभापती अंकुश जाधव यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे दिले आहे.
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, तेरवण मेढे उन्नेयी बंधार्याचा कालवा मंगळवारी घोटगेवाडी येथे कोसळला. यामुळे घोटगे, परमे, व बरोबर हंगामी शेती होरपळणार आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी व दोषी अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
कालवा स्वच्छता व देखभाल याकरिता दरवर्षी 35 लक्ष रुपयांची निविदा काढली जाते. गेल्या वर्षी केर नाल्यावर जवळपास 20 लक्ष रूपये दुरूस्तीचे काम केले. तेथेच पुन्हा अधिकार्यांनी जादूची कांडी फिरवत कालवा स्वच्छता ठेका काढला आहे. या टेंडरवर कालवा निरीक्षक, क्लार्क, गेट चालू बंद करण्या करिता कामगार व स्वच्छता करण्यासाठी मजूर पुरवायचे काम आहे. परंतु चार परप्रांतीय मजूर कामावरती हजर आहेत. अन्य एकही कामगार कालवा देखभाल दुरुस्ती व मनुष्यबळ पुरवठा कामावर हजर नाही. ही गंभीर बाब आहे. मग असे कालवे फुटणार आणि याला जबाबदार अधिकारी आहेत. त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी. असेही श्री. जाधव म्हणाले.
वारंवार कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत. वर्ष पूर्ण व्हायच्या आत केर नाल्यावरील जलवाहिनी कोसळते. या दुर्घटनेचे विश्लेषण व चिकित्सा व्हायला हवी. या प्रकाराला काम करून घेणारे किंवा कामं पाहणारे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. अधिकारी कामावरती जात नाहीत. त्यांनी कोनाळकट्टा वसाहतीमध्ये, मुख्यालयात रहाणे बंधनकारक असताना ते दोडामार्ग मध्ये राहतात. ठेकेदाराच्या गाड्या फिरवतात. एक अधिकारी तर 100 किलोमीटर गाडी फिरल्याची नोंद करतात. कारण दोडामार्गतून घेऊन येणे व परत नेऊन सोडणे यावरती गाडी 80 किलो मीटर फिरते. यातूनच पैशांची कशी उधळण करावी हे तिलारी जलसंपदा विभागाकडून शिकावे.
बाधित शेतकर्यांची पाणीपट्टी माफ करा
प्रकल्पबाधित शेतकर्यांची पाणीपट्टी जलसंपदा विभागाने माफ करावी व जी असेल ती नुकसान भरपाई शेतकर्यांना द्यावी. केर नाल्यावरील जलवाहिनीची जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियत्यांनी पाहणी करावी. जलसंपदा विभागाने या दोषी अधिकारी व निवृत्त अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी. तसेच संबंधित ठेकेदाराची जलसंपदा विभागात सुरू असलेली कामे त्वरित काढून घ्यावीत, आदी मागण्या श्री. जाधव यांनी या निवेदनाद्वारे ना. राणेंकडे केल्या आहेत.