बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर मंगळवार, शुक्रवारी तेलबियांचे व बुधवारी आणि शनिवारी कापसाचे लिलाव घेतले जात होते. परंतु, सध्या आवक घटल्याने आणि सध्या हंगाम नसल्याने बारामती मर्चंट असोसिएशनच्या मागणीनुसार तेलबिया व कापसाचे उघड लिलाव फक्त दर मंगळवारीच होणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
यापूर्वी तेलबिया व कापसाचे लिलाव आठवड्यातून दोनदा वेगवेगळ्या दिवशी घेतले जात होते. हंगामात आवक जादा असल्याने तो निर्णय घेतला गेला होता. परंतु, आता आवक कमी झाली असल्याने तेलबिया व कापूस या दोन्हींचे लिलाव फक्त दर मंगळवारीच घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपला शेतमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून मंगळवारी बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे. बाजार समिती आवारात सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग शेंग या शेतमालाची आवक साधारण असून, चालू आठवड्यात सोयाबीनला किमान 3850 रुपये, तर कमाल 4051 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
सूर्यफुलाला कमाल दर 6651 रुपये व भुईमूग शेंगाला कमाल 4800 रुपये प्रतिक्विंटल दर निघाला. कापसाला कमाल 6500 रुपये आणि सरासरी 6400 रुपये असे दर निघाले.
बारामती बाजार समितीत शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करण्यास 6 फेब—ुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून 350 शेतकर्यांची 3028 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली.
अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती