Published on
:
24 Nov 2024, 2:04 am
Updated on
:
24 Nov 2024, 2:04 am
कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेचा प्रभाव, हिंदुत्वाचा मुद्दा यामुळे महाविकास आघाडी विरोधात निर्माण झालेली सुप्त लाट लक्षात न आल्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. हे जरी खरे असले, तरी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात अधिक गुंतलेले आमदार सतेज पाटील यांचे झालेले दुर्लक्ष व त्यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघ संभाळण्यात आ. ऋतुराज पाटील यांना आलेले अपयश याचादेखील फटका बसल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महाडिक यांनी केलेल्या परफेक्ट नियोजनामुळे भाजपचे अमल महाडिक पुन्हा एकदा दक्षिणवर स्वार झाले.
आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष संपूर्ण जिल्ह्यात गाजत आहे. जवळपास गेल्या दोन दशकांपासून त्यांच्यामध्ये हा राजकीय संघर्ष सुरू आहे. गोकुळच्या निवडणुकीवरून तर त्याला अधिकच धार आली. जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून पाटील यांनी हळूहळू जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. यादरम्यान, राज्याच्या राजकारणातही त्यांचे नाव घेण्यात येऊ लागले. सन 2014 च्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी एकवीस दिवसांत आ. सतेज पाटील यांचा पराभव केला होता. परंतु, या पराभवाने खचून न जाता पाटील यांनी आपले काम सुरू ठेवले. विधानसभेनंतर काही महिन्यांतच विधान परिषदेची निवडणूक लागली. या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेत त्यांनी थेट महादेवराव महाडिक यांनाच आव्हान दिले. या निवडणुकीत पाटील सर्व तयारीने उतरत महाडिक यांचा पराभव केल्यामुळे पाटील यांचे जिल्ह्यात राजकीय वजन वाढले.
आ. पाटील विधानपरिषदेवर गेल्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कोण, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि आ. पाटील यांनी आपले पुतणे ऋतुराज पाटील यांना कोल्हापूर दक्षिणमधून रिंगणात उतरविले. नवा चेहरा मतदारांना भावला तसेच आ. पाटील यांनी परफेक्ट नियोजन करून या निवडणुकीत अमल महाडिक यांचा पराभव करत पुन्हा दक्षिणवर काँग्रेसचा झेंडा फडकविला. या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे चार आमदार निवडून आणल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले होते. दक्षिणमधील पराभव महाडिक यांच्या जिव्हारी लागला होता. यानंतर आ. पाटील व महादेवराव महाडिक यांच्यातील आरोप, प्रत्यारोपांना अधिकच धार आली. वयोमानानुसार महादेवराव महाडिक यांनी जाहीर कार्यक्रमापासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतल्याने महाडिक गटाच्या वतीने आरोपांना उत्तर खा. धनंजय महाडिक देऊ लागले. त्यामुळे खा. महाडिक व आ. सतेज पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आ. सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातही त्यांचा वावर सुरू झाला. जिल्ह्याचे राजकारण बघत असताना आ. पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील लढतीपेक्षा शेजारच्या मतदारसंघातील लढती प्रतिष्ठेच्या बनविल्या. त्यासाठी त्यांनी अधिक लक्ष दिले. आपल्या मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी ज्या विश्वासाने आपल्या कार्यकर्त्यांवर टाकली होती, त्या विश्वासास पात्र राहून कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. आ. सतेज पाटील राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आपल्या मतदारसंघावर आ. ऋतुराज पाटील यांनी लक्ष देणे आवश्यक होते. परंतु, त्या प्रमाणात त्यांनी मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजनेचाही परिणाम झाला. स्टार प्रचारकांच्या यादीत आ. सतेज पाटील यांचा समावेश असल्याने प्रचाराच्या निमित्ताने ते बाहेर फिरत होते. याचा फायदा घेऊन विरोधकांनी शेवटच्या टप्प्यात केलेल्या खेळ्यांमुळेच अमल महाडिक कोल्हापूर दक्षिणचा गड आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी झाले. पहिल्या फेरीपासून महाडिक यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. खा. महाडिक यांनी महिलांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. हा प्रचाराच मुद्दा बनविण्यात आला होता. परंतु, त्याचा मतदारांवर काही फरक पडला नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येते.