Published on
:
28 Nov 2024, 1:26 am
Updated on
:
28 Nov 2024, 1:26 am
सोलापूर : दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा यंदाच्या वर्षी लवकर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. तोंडी परीक्षेसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी राहिल्याने शिक्षक दहावी-बारावीचा अभ्यासक्रम लवकर पूर्ण करण्यावर भर देत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी ते मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्याचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. दोन्ही परीक्षा नियोजित तारखांच्या दहा दिवस अगोदरच आल्याने शिक्षकांकडून अभ्यासक्रम लवकर आटोपण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसर्या सत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक व्यस्त झाले होते. त्यामुळे अभ्यासक्रम शिकविणे थांबले होते. त्यातच 21 नोव्हेंबरला बोर्डाने दहावी-बारावीचे अंतिम वेळापत्रक वेबसाइटवर टाकले आहे. त्यामुळे शिक्षक आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत.
24 जानेवारीपासून बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, मूल्यमापन, तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
3 ते 20 फेबु्रवारीला दहावीची तोंडी परीक्षा
दहावी परीक्षेची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे दहावीचे विद्यार्थ्यांनी आतापासून परीक्षेची तयारी सुरू केली आहे.