SSC & HSC Board Exam : राज्यात दहावी-बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. त्यासाठी 20 जानेवारीपासून हॉल तिकीट मिळणार आहे. या हॉल तिकिटांवर राज्य सरकारने आता जात आणली आहे. हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख असणार आहे. सरकारच्या या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विरोधकांकडून टीका केली जात आहे. परंतु शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. तसेच जातीचा उल्लेख का? त्याचे कारण त्यांनी दिले आहे.
का आला जातीचा उल्लेख?
शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, आपण जर पाहल तर त्या हॉल तिकिटावर केवळ जातीचा उल्लेख नाही. तर संपूर्ण माहिती त्यावर दिलेली आहे. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांच शालेय शिक्षण झाल्यावर त्याच्या प्रमाणपत्रावर जातीचा उल्लेख चुकीचा असल्याचे लक्षात येतो. त्यानंतर ते दुरुस्तीसाठी फार त्रास होतो. त्यामुळे आता हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आला. त्यामागे शिक्षण विभागाचा एकच उद्देश आहे. तो म्हणजे, जर पालकांनी हॉल तिकीट पाहिले आणि त्यांना वाटले की यात पाल्याच्या जातीबाबत चुकीची माहिती आली आहे तर ती शाळेतून दुरुस्त करता येईल. यामुळेच हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आला, असे पंकज भोयर यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडून सरकारच्या निर्णयावर टीका
दरम्यान, शासनाच्या या निर्णयास शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार विरोध केला. त्यांनी म्हटले की, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटवर जातीचा उल्लेख करणे गंभीर आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवे.
हे सुद्धा वाचा
शिक्षण तत्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सरकारचा हा निर्णय चुकाचा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणे चुकीचे आहे. हॉल तिकीट हे तात्पुरते आहे, मग त्यावर जातीचा उल्लेख करण्याची गरज काय? असा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले, शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असतो. त्याची सर्व जबाबदारी शाळा घेत असते. त्यानंतर हॉल तिकिटावर उल्लेख करण्याचे कारण काय? शिक्षण विभागाने या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज आहे.