Published on
:
15 Nov 2024, 11:57 am
Updated on
:
15 Nov 2024, 11:57 am
नवी दिल्ली : राजधानीत प्रदूषण नियंत्रणासाठी श्रेणीबद्ध उपाययोजनांचा तिसरा टप्पा आजपासून लागू करण्यात आला आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' श्रेणीत पोहोचल्यामुळे वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून मेट्रो फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. दिल्ली मेट्रोतर्फे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत एकूण ६० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. इयत्ता ५ वी पर्यंत सर्व शाळा ऑनलाईन माध्यमातून भरवण्याचा निर्णय दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी जाहीर केला. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी प्रदूषण विरोधी मोहिमेचा आज आढावा घेतला.
प्रदूषण कमी करण्यासाठीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोतर्फे आजपासून सोमवार ते शुक्रवार दरम्यान २० फेऱ्या अतिरिक वाढविण्याचा निर्णय दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने घेतला आहे. दिल्ली मेट्रोचे जाळे असलेल्या सर्व मार्गांवर आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली. तत्पुर्वी ऑक्टोबरमध्ये जेव्हा प्रदूषण नियंत्रणासाठी श्रेणीबद्ध उपाययोजनांचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला होता, त्यावेळी ४० अतिरीक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. आधी ४० आणि आता २० अशा एकूण ६० मेट्रोच्या फेऱ्या आतापर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळा 'ऑनलाईन'
राजधानी दिल्लीत प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाचवीपर्यंत शाळा ऑनलाईन माध्यमाद्वारे भरवण्याचा निर्णय दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशी यांनी जाहीर केला. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक काही भागांमध्ये ५०० च्या पुढे गेल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. त्यानंतर गुरुवारी रात्री दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा ऑनलाईन भरवल्या जातील. पुढच्या सूचनेपर्यंत दिल्लीतील शाळा ऑनलाइन माध्यमाद्वारेच भरवल्या जातील, असेही मुख्यमंत्री अतिशी यांनी स्पष्ट केले.