Published on
:
15 Nov 2024, 2:55 pm
Updated on
:
15 Nov 2024, 2:55 pm
धाराशिव : अडीच वर्षे सत्तेत राहिलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारच्या अनेक योजनांना या सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र दोन पावले मागे गेल्याची टिका करीत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील तसेच शिवसेनेचे अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी ते शुक्रवारी जिल्ह्यात आले होते. त्यानंतर ते प्रतिष्ठान भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, खंडेराव चौरे, अॅड. मिलींद पाटील आदी उपस्थित होते.
कराड म्हणाले, की ठाकरे सरकारने मविआाच्या सत्ता काळात केंद्राच्या अनेक योजनांना स्थगिती दिली होती. या शिवाय पूर्वीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांनाही अडथळे निर्माण केले होते. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या अनेक योजनांना खीळ बसली. याचा मोठा फटका धाराशिव, बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यांना बसला. या योजनांतून 56 टीएमसी पाणी मराठवाड्याला पाणी मिळणार होते.(Maharashtra assembly poll)
जनता महायुतीला विजयी करेल
ठाकरे सरकारच्या धोरणामुळे या सर्व योजनांना अडथळा निर्माण झाला. मागील सव्वादोन वर्षांत महायुती सरकारने घेतलेल्या अनेक योजनांमुळे राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारले आहे. लाडक्या बहिण योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. पीक विमा एक रुपयांत उपलब्ध केला आहे. या शिवाय समाजातील प्रत्येक घटकांसाठी महायुती सरकारने न्याय देणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील जनता महायुतीला विजयी करेल याची खात्री आहे, असा विश्वासही कराड यांनी यावेळी व्यक्त केला.