Published on
:
15 Nov 2024, 4:58 pm
Updated on
:
15 Nov 2024, 4:58 pm
चंद्रपूर : मोदी सरकारने देशाची प्रगती साधताना महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवला. आता छत्तीसगडमध्ये नक्षलवाद शिल्लक आहे, तो ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात येईल. मविआ च्या काळात महाराष्ट्राचा गौरव कमी झाला, महायुतीचे शासन आले तर तो गौरव परत आणू. असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे स्टार प्रचारक व केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी केले. ते चंद्रपूर येथे शुक्रवारी(दि.१५) भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी मंचावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,खा.फग्गनसिंह कुलस्ते,महायुतीचे उमेदवार ना.सुधीर मुनगंटीवार,किशोर जोरगेवार,देवराव भोंगळे,करण देवतळे,भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,हरीश शर्मा आदींची उपस्थिती होती.
ना.शहा म्हणाले, मोदी सरकारने अनेक विकास कामे केली. काश्मिरातील ३७० कलम रद्द केले, राम मंदिर उभारले, सीएए कायदा आणला, आता वक्फ चा कायदा बदलायचा आहे. आम्ही औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे सरकार हवे की औरंगजेब फॅन क्लबच्या मार्गावरील? असा प्रश्न त्यांनी जनतेला केला. मोदी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाकरिता १५ लाख कोटी दिले. आज महाराष्ट्राचा विकास होतोय.मोदींच्या काळात देशाची प्रतिमा जगात उंचावली. देश सक्षम झाला आहे. महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.