शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज भाजप नेते नारायण राणे यांच्याबाबत नवं भाकीत वर्तवलं आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे भाजपच्या तिकीटावर आणि दुसरे पुत्र निलेश राणे हे शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी लढवत आहेत. याच मुद्द्यावरुन सुषमा अंधारे यांनी नवं भाकीत वर्तवलं आहे. “भाजपला राणेंचा गेम करायचा आहे. म्हणून त्यांच्या दोन्ही पुत्रांना दोन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवायला सांगितलं आहे”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
“महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यासाठी आज कोकणात आले. नारायण राणेंचे दोन मतदारसंघात दोन मुलं आमदारकीला उभे आहेत. तर स्वतः वडील खासदार आहेत. तिसरा मुलगा असता तर त्याला नारायण राणेंनी सावंतवाडीमध्ये उभं केलं असतं. त्यांना विकासाचा ध्यास आहे. त्यांना असं कोणतं पद मिळालं नाही की ते विकास करू शकले नाहीत. जो माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही तर अजून कोणतं पद पाहिजे होतं?”, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
‘निलेश राणे आमचे स्टार प्रचारक’
“ट्रम्प तात्यांच्या ऐवजी नारायण राणेंना पद दिलं पाहिजे होतं. कोकणात दहशत आहे ती दूर करण्यासाठी आम्हाला मत हवंय. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. निलेश राणे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा तेव्हा महाविकास आघाडीची मते वाढतात. ते आमचे स्टार प्रचारक होतात”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
हे सुद्धा वाचा
‘चिखलफेक करणारे निलेश राणे शिंदेंना चालतील का?’
“ज्या एकनाथ शिंदेनी चित्रपट बनवले त्यांनी ‘धर्मवीर 3’ काढावा आणि निलेश राणेंची मुक्ताफळ दाखवावीत. बाळासाहेबांना खुनी, आरोपी बोलणारे निलेश राणे शिंदेंना चालतील का? शिंदेंनी निलेश राणेंच्या वक्तव्याबाबत प्रचारसभेत बोलावं. चिखलफेक करणारे निलेश राणे शिंदेंना चालतील का? नारायण राणे यांनी चिन्हं संपविण्याचा घाट घातला, त्या चिन्हावर लढणारे राणे चालतात का?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
‘राणेंना पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील’
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भांडवल केले जात आहे. नारायण राणेंची कार्यपद्धत शिंदेंना मान्य आहे का? राणेंनी कोकण कायम लुटून खाण्याचा प्रयत्न केला”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तसेच “राणेंना पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. फडणवीस यांची ध्वनीफीत फिरतेय. त्यावरून समजतं. कोकणातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार. यावेळी खुद्दारी विरुद्ध गद्धरी अशी लढत आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
‘राणे बंधूंचा भाजपला गेम करायचाय’
“किती कोटी निधी आणला त्याचे नुसते आकडे नाचवू नका. तपशील द्या. इकडे बेंच घोटाळा झाला त्यावर बोला. नितेश राणे तुम्ही भ्रमात आहात. जागे व्हा. भाजपला राणेंचा गेम करायचा आहे. जर गेम करायचा नसता तर निलेशला शिंदे जवळ जायला दिलं नसतं. मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आणि फडणवीस एकमेकांचे गडी बाद करत आहेत. नितेश राणे आणि निलेश राणे यांचा भाजपला गेम करायचा आहे आणि ते उदय सामंत यांना देखील आवडेल”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.