Published on
:
18 Nov 2024, 3:01 pm
Updated on
:
18 Nov 2024, 3:01 pm
बारामती : पुढारी वृत्तसेवा: देशात बारामतीची ओळख कोणामुळे आहे. हे सगळ्यांना माहीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला. मी बारामतीत काम केले, अजित पवार आल्यावर त्यांनी काम केले. त्यांनी केलेल्या कामाबद्दल माझी तक्रार नाही, पण आता नव्या पिढीकडे सूत्रे सोपवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी युगेंद्र पवार यांना साथ द्या, असे आवाहन केले.
मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या सांगता सभेत ते बोलत होते. या वेळी खा. सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, डाॅ. अमोल कोल्हे, उत्तम जानकर, जगन्नाथ शेवाळे, सदाशिव सातव, पौर्णिमा तावरे, सक्षणा सलगर, विकास लवांडे, सतीश खोमणे आदींची उपस्थिती होती. (Maharashtra Assembly Polls)
शरद पवार यांनी या वेळी भाजपवर हल्ला केला. देशाचा कारभार करायचा असेल, तर चारशे खासदारांची आवश्यकता नाही, मात्र नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबडेकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये सुधार करण्यासाठी ४०० खासदारांची आवश्यकता होती, अशी टीका पवार यांनी केली. २५० ते ३०० खासदारांची आवश्यकता असताना ४०० खासदारांचा नारा दिल्यामुळे आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न होता हे स्पष्ट होते, तो या देशातील जनतेने हाणून पाडला. तसेच राज्यातील ४८ पैकी ३० जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला. असाच निकाल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागणार असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली याला माझा विरोध नाही, मात्र दुसऱ्या बाजूला बहिणीची सुरक्षा होत नाही. हजारो महिलांवर अत्याचार होत आहेत. महायुतीच्या काळात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले. या वेळी महिलांची सुरक्षा कुठे गेली, राज्यातील ६४ महिला बेपत्ता आहेत यावर सरकारने काय उपाययोजना केली याची माहिती द्यावी. महायुतीच्या काळात राज्यातील वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीमालाला किंमत नसणे, कर्जबाजारीपणा यामुळे या आत्महत्या वाढत असल्याचे शरद पवार म्हणाले.
माझी पिढी झाली, अजित पवार यांची झाली. आता पुढची पिढी युगेंद्रची आहे. त्याच्याकडे मी आता बारामतीची जबाबदारी देतो आहे. तो उच्चशिक्षित, चारित्र्यसंपन्न आहे. आम्ही ज्या कष्टाने बारामतीचा विकास केला, त्यापेक्षा अधिक मेहनत तो घेईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे शरद पवार म्हणाले. युगेंद्र पवार यांनी भाषणात मलिदा गँगच्या दहशतीतून सुटका करू अशी ग्वाही दिली.