धावत्या गाडीत विजयला घातली गोळी; रक्ताच्या दोन डागांनी खुनाला फोडली वाचाFile Photo
Published on
:
28 Nov 2024, 3:30 am
Updated on
:
28 Nov 2024, 3:30 am
विजय आणि कमला (नावे बदललेली) दोघे एकमेकांच्या परिचयाचे... पूजाअर्चा करून दोघे उदरनिर्वाह करत होते. विजय कमलापेक्षा आता मोठा होत चालला होता. त्यांच्या गुरूनेदेखील त्याच्यावर मेहरनजर केली होती. त्यामुळे त्याच्या दरबारात मोठी रांग लागायची. दिवसेंदिवस तो आर्थिक सुबत्तेबरोबर पंथात मानपानाने मोठा होत होता, तर दुसरीकडे कमलाचा रुतबा कमी होत चालल्यामुळे ती बेचैन झाली होती. सुडाने पेटलेल्या कमलाने शांत डोक्याने विजयचा काटा काढण्याचा डाव रचला... एवढेच नाही, तर २० लाखांना सुपारी देऊन त्याचा 'गेम' ही केला; मात्र वारजे पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना गजाआड केले.
कमलाला काही करून विजयचा काटा काढायचा होता. त्यासाठी तिने सर्व प्रकारचे डाव टाकण्यास सुरुवात केली होती. तिला माहिती होते की, विजय हा पूजाअर्चा करतो. तोच धागा पकडून तिने अखेरचा डाव टाकला. कमलाच्या सांगण्यावरून तिघेजण जमिनीचा व्यवहार होत नसल्यामुळे विधी करण्यासाठी एका चारचाकी गाडीतून १८ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विजयला मुळशीच्या दिशेने घेऊन गेले. ती गाडी त्यांनी कोथरूड येथील एका गॅरेजवरून भाड्याने घेतली होती. काही वेळातच गाडी थेट ताम्हिणी घाटाच्या दिशेने वेगात धावू लागली. विजय याला काही तरी काळ बेरं होण्याची चाहूल लागली होती. तो गाडीतील तिघांना विचारत होता, 'आपण कोठे चाललो आहोत?' मात्र, आरोपींनी रस्ता चुकल्याचे सांगत गाडी घाटातून खाली उतरवली.
एका पंपावर गाडीत डिझेल भरून परत पुण्याच्या दिशेने निघाले. चालत्या गाडीतच तिघांनी पिस्तुलातून गोळी झाडून विजयचा खून केला. दरम्यान तिषा आरोपीमध्ये एकजण विजय याचा चेला होता. अचानक झालेल्या प्रकारामुळे तो घाबरून गेला. धमकी देत त्यालादेखील दोघांनी आपल्यात सहभागी करून घेतले. नांदिवली गावच्या जंगल परिसरातील एका खड्ड्यात विजयचा मृतदेह तिघांनी पुरून टाकला. तेथून आरोपी पुण्यात आले. आपल्या कृत्याचा पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तिघांनी पूर्ण काळजी घेतली. एका आरोपीच्या शर्टावर विजयच्या रक्ताचे डाग पडले होते. आरोपींनी त्याच्या अंगावरील कपडे काढून घेतले. त्यानंतर मेडिकलमधून निर्जंतुकीकरणाचे औषध घेऊन गाडी साफ करून गैरेजमालकाच्या ताब्यात दिली.
इकडे रात्रभर विजय घरी न आल्यामुळे शोधाशोध सुरू झाली होती. त्यानंतर बहिणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांना चौकशीदरम्यान काहीतरी काळेबेरे झाल्याची चाहूल लागली. त्यानुसार त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींची गाडी दिसली. त्यांनी गाडीमालकाला शोधून गाडी ताब्यात घेतली. गाडीमध्ये रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर गाडी भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीकडून आरोपींची माहिती मिळवली. तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तिघा आरोपीपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला.
आरोपीला गाडीत बसवून पोलिस पथकाने थेट नांदिवली गावचे जंगल गाठले. तेथील एका खड्ड्यात विजयचा मृतदेह मिळून आला. शवविच्छेदन अहवालात गोळी झाडून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. रक्ताच्या दोन डागांनी खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडून आरोपींना बेड्या ठोकण्यास मदत केली. त्यामुळे गुन्हेगार कितीही शातीर असला तरी पोलिसांच्या नजरेतून तो सुटत नाही हे या घटनेवरून दिसून येते.