आ. समाधान आवताडेFile Photo
Published on
:
28 Nov 2024, 11:31 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:31 pm
मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 8430 मतांनी विजय मिळवला. त्यांनी गतवेळचे प्रतिस्पर्धी भगीरथ भालके यांचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून 45 हजारांचे मताधिक्य घेतलेल्या काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांच्यामुळे मतदारसंघात काँग्रेसचे वातावरण तयार झाले होते. अशात भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना तिकीट मिळणार की प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते.
मतदारसंघामध्ये पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांना बोलवण्यात आले होते. त्यांच्याकडून लिखित स्वरूपामध्ये संभाव्य उमेदवार कोण असावा याबाबत मते आजमावण्यात आली. यामध्ये आ. समाधान आवताडे यांनी बाजी मारली. राज्य व केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या शेतकरी, महिला, युवक व लहान जाती समूह यासाठीच्या योजना प्रभावीपणे मांडण्यात आवताडे यांना यश आले. आवताडेंकडून रक्षाबंधननिमित्त महिला मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये महिलांचा सन्मान करण्यात आला. कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रचाराचा प्रभावी मार्ग या मेळाव्यातून दिसून आला.
आवताडे यांनी पंढरपूरमधून प्रशांत परिचारक यांचा विश्वास संपादन करत, तर मंगळवेढ्यातील शहरातील काही विरोधातील पदाधिकारी व पूर्व भाग व दक्षिण भागामध्ये गुप्त प्रचारयंत्रणा राबवत अनेक विरोधकातील सहकार्यांना व्यक्तिगत भेटून बेरजेचे राजकारण केले. त्याचा प्रभाव निवडणुकीतील मतदानावर दिसून आला. मंगळवेढ्यातील ग्रामीण भागासाठी मंगळवेढा उपसासिंचन योजना मार्गी लावण्याचे काम आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यकाळात झाले. यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आंधळगाव येथे मोठा मेळावा घेतला. याशिवाय त्यांनी नितीन गडकरी यांची सभा मंगळवेढा शहरामध्ये घेतली. या सभेमध्ये प्रशांत परिचारक उपस्थित होते.
यावेळी गडकरी यांनी त्यांना आपण आवताडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले. यानंतर पंढरपूर शहरात मिळालेल्या मताधिक्क्यामुळे गडकरी यांच्या शब्दाला परिचारक यांनी मान दिल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या पंधरा दिवसांच्या काळात आमदार आवताडे यांनी विरोधकांवर कोणतेही व्यक्तीगत पद्धतीने टीका न करता साडेतीन वर्षांच्या कार्यकाळामध्ये मिळालेल्या कामाच्या संधीचे कशा पद्धतीने वापर केला हे मतदारांना सांगितले. त्यांनी मंजूर केलेली कामे यावरच भर दिल्याचे दिसून आले. विरोधकांकडून तीन हजार कोटींच्या विकासकामांबाबत सातत्याने होणार्या टिकेला सकारात्मक घेत त्यांनी विकासकामांचा पाढा वाचत दाखवत सभेतील उपस्थित लोकांना विकासकामे झाली आहेत, यावर विश्वास निर्माण करण्यात यश मिळवले. ‘काम दमदार, जनतेचे आमदार’ या घोषणा या निवडणुकीत आ. आवताडे यांना फायदेशीर ठरल्या आहेत.