हजारो कोटींचा तोटा सहन करत असलेल्या बेस्ट उपक्रमाने नवीन वर्षांत तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेत प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. याचा फायदा सुमारे 32 लाख प्रवाशांना होणार आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमाचा 2025-26चा अर्थसंकल्प आज बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी पालिकेतील प्रशासकीय स्थायी समिती तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला.
मुंबईच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्याने 8 मार्च 2022पासून मुंबई महापालिका व बेस्ट उपक्रमात प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचा 2024-2025चा 2,523.94 कोटींचा अर्थसंकल्प 29 नोव्हेंबर 2023 रोजी पालिकेच्या स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. यंदाचा अर्थसंकल्पही स्थायी समिती आणि पालिका प्रशासकांना सादर करण्यात आला. या वेळी पालिका आयुक्तांचे सचिव चंद्रशेखर चोरे, पालिका चिटणीस रसिका देसाई उपस्थित होते.
वीज उपक्रमाची चांगली कामगिरी
2019 ते आतापर्यंत बेस्ट उपक्रमाला तब्बल 9 हजार 286 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा तोटय़ात असली तरी बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाची आर्थिक स्थिती चांगली आहे, तसेच बेस्ट उपक्रमाचा गाडा रुळांवर आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पैशांची मागणी केल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.