ध्येय गाठण्यासाठी अधिक परिश्रम करा- कटियार:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘डीन ॲड्रेस’; मान्यवरांची उपस्थिती

6 hours ago 1
एमबीबीएसचे स्वप्न ही फक्त सुरुवात असून ध्येय गाठण्यासाठी भविष्यात अधिक परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सत्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी देशाच्या वेगवेगळ्या भागातून नव्यानेच अमरावतीत दाखल झालेल्या ९९ विद्यार्थ्यांसाठी ‘डीन ॲड्रेस’ कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रयास संस्थेचे डॉ. अविनाश सावजी व महान संस्थेचे डॉ. आशिष सातव उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वत:ला बहुआयामी सिद्ध करत अधिक प्रगती करावी. त्यांनी आपले शैक्षणिक सत्र प्राथमिकतेने पूर्ण करावे. याशिवाय इतर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष द्यावे. त्यांनी इतर विषयांची पुस्तके व ग्रंथ वाचन करून सर्व विषयातील माहिती घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी कटियार यांनी केले. दरम्यान आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांनी निश्चित केलेले ध्येय अथक परिश्रमामुळे मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी सर्व विभागांनी, विशेषत: आधीचे डीन डॉ. अनिल बत्रा, विद्यमान डीन डॉ. किशोर इंगोले आणि कर्मचारी यांचे कौतुक केले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, प्रशासकीय अधिकारी संजय मैदानकर, शिवम घारड, जयश्री घाडगे, पीयूष सरोदे आदी उपस्थित होते. वैद्यकीय व्यवसायातून सामाजिक कार्य करा या वेळी डॉ. अविनाश सावजी व डॉ. आशिष सातव यांनीही दोन वेगवेगळ्या विषयांसह वैद्यकीय सेवेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. वैद्यकीय व्यवसायातून त्यांनी सामाजिक कार्य करावे, असे आवाहनही केले. अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनीही मार्गदर्शन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. नितीन अंभोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी नियुक्त कंत्राटदार देशमुख यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article