Sanjay Raut Rokhthok : महाराष्ट्रातील सरकार अदानी यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखवत आहे, कारण अदानी यांच्याकडे मोदी यांची दौलत आहे. पण महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही. अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर मोठा घणाघात केला. महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे. मुंबई त्यांना संपूर्णपणे गिळायची आहे व त्याची तयारी पूर्ण झाली आहे. फोर्ट भागात संयुक्त महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक आज आहे. हा मोक्याचा भूखंडही उद्या अदानी ताब्यात घेतील व उद्या त्या स्मारकावर अदानींचा टॉवर उभा राहिलेला दिसेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता लोकांना माहीत नाही. अदानी त्यांच्यापेक्षा मोठे. एका मोकळ्या भूखंडावर अदानीचा टॉवर उभा राहील. पहा, विकास झाला असे म्हणत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे जाहिराती करतील! मराठी माणसा, हे तुझ्या डोळ्यांदेखत घडू द्यायचे काय? अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा, असे संजय राऊत म्हणाले.