महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना जयंत पाटील. Pudhari Photo
Published on
:
15 Nov 2024, 11:41 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:41 pm
पंढरपूर : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच आहेत. भगीरथ भालके यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र, पवार यांनी निर्णय घ्यायच्या अगोदरच त्यांनी वेगळी भूमिका घेतली. पवार यांच्या निर्णयाची वाट न बघणार्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची ही वेळ असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ, पंढरपूर येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. या सभेला मा. खा. विजयसिंह मोहिते-पाटील, प्रा. लक्ष्मण ढोबळे, पक्ष निरीक्षक शेखर माने, रवी पाटील, वसंतनाना देशमुख, सुभाष भोसले, अमर सूर्यवंशी, रवी मुळे, डॉ. संजयकुमार भोसले, संतोष नेहतराव, संदीप मांढवे, सुधीर भोसले, सुधील अभंगाराव, राहुल शहा, प्रथमेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई आहे, शेतकरी संतप्त आहेत. मात्र, या मूलभूत समस्यांकडे बघायला भाजपला वेळ नाही. भाजप फक्त जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’. त्यांना सांगितले पाहिजे की, ‘बटेंगे तो कटेंगे नही, ‘पढेंगे तो बचेंगे’, असे सांगत म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडविणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न आमचेच सरकार सोडवणार. समोर जरी काँग्रेसचा उमेदवार असला, तरी या लढतीचे विश्लेषण करायचे झाले, तर ही मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र, अनिल सावंत यांना शरद पवारांचे आशीर्वाद आहेत, ते विसरू नका, असे सांगितले.
अनिल सावंत म्हणाले की, पक्षाने उमेदवार देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास मी सार्थक करून दाखवणार आहे. मला कोणावर टीका करायची नाही. एक परिचारकांच्या जीवावर आमदार झालेला व्यक्ती आहे, तर दुसरा आपल्या सहकार पक्षातले उमेदवार हे नेहमी नॉट रिचेबल असतात. अशी भालके यांच्यावर टीका करत या मतदारसंघात विद्यमान आमदार सांगतात 3000 कोटींची कामे केली. मात्र, हे केवळ मोठमोठे आकडे सांगतात. त्यांची कामे फक्त कागदावर आहेत. मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही जुना कामचुकार सालगडी बदला आणि कामाचा नवीन सालगडी म्हणून मला निवडून आणा, असे आवाहन केले.