गेल्या पंच्याहत्तर वर्षात राजकारणी व येथील नेतृत्वाने कोकणचा पर्यटनद़ृष्ट्या विकास करण्याचे किंबहुना कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्नपाहिले आहे. कोकणातून पाच मंत्री सत्तेत बसले आहेत. सत्तेच्या या पंचसुत्रीचा कोकणास लाभ होणे अपेक्षीत आहे. पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध असलेल्या कोकणचा गोवा किंवा केरळप्रमाणे पर्यटनदृष्ट्या विकासाच्या शक्यता तपासून पाऊले उचलणे गरजेचे आहे. कोकणाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देता येईल का, यासंदर्भात विचार आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकार स्तरावरून स्वतंत्र पर्यटन धोरण राबविण्याचीही आवश्यकता आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत कोकणास मोठा वाटा मिळाल्याने सत्तेच्या माध्यमातून कोकणच्या दीर्घकालीन विकासाचे धोरण आखले जाण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. अरबी समुद्र व सह्याद्रीच्या मधल्या भागातील चिंचोळ्या पट्यात वसलेला कोकण हा भूप्रदेश भगवान परशुरामांची भूमी म्हणून ओळखला जातो. बदलत्या काळात साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, संगीत, तत्वज्ञान, मनोरंजन सर्वच क्षेत्रावर मुळच्या कोकणी व्यक्तिमत्वांचा मोठा प्रभाव दिसून येतो. कोकणातून नऊ भारतरत्ने निर्माण झाली. जैवविविधता, नैसर्गिक, अल्हाददायी पर्यावरण व विविधतेने नटलेल्या येथील सांस्कृतिक लोकजीवनाची जगास भुरळ पडली नाही तर नवल. येथील प्रथा, परंपरा, चालिरीती, बोलीभाषा, खानपान व नेहमीचे राहणे, जगणे सारे काही वेगळे आहे. इतकी बलस्थाने असतानाही मुलतः बंडखोर व प्रस्थापितांना विरोधाच्या मनोवृत्तीमुळे कोकणास राजसत्तेचे लाभ कधीही मिळवता आले नाहीत, हे तितकेच खरे आहे. गेल्या दहा वर्षापासून मात्र कोकणच्या मुळच्या वृत्तीत मोठे बदल होताना दिसून आले आहेत. चोखंदळ कोकणी मानसिकतेत झालेला हा बदल राजसत्तेकडून खुंटलेल्या विकासास गती देण्याची अपेक्षा ठेवून असल्याचे संकेत देऊन गेला आहे. त्यामुळे राजसत्तेची जबाबदारी वाढली आहे.
आता केवळ घोषणा व आश्वासनांवर काम भागणार नाही, प्रत्यक्ष कृतीही करावी लागणार आहे. कोकणातील पर्यटन, फळ लागवड, मत्स्यशेती, रोजगार निर्मितीच्या सर्व संभाव्य संधीचा विचार करुन त्या अधिक प्रशस्त होण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखून त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. याकरिता आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे कोकणात गेल्या दहा वर्षापासून उभे रहात आहे. त्याला आता अधिक अधिक गती देण्याची गरज आहे.
सरकार स्तरावरून आता कोकण सागरी महामार्गासाठी सात सागरी पुलाच्या निर्मितीसाठी पाऊल उचलले गेले आहे. त्याबाबत निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली. कोस्टल वे प्रकल्प बर्याच कालावधीत प्रलंबित राहिला. आता तो पूर्णत्वाकडे जाण्याचा आशावाद निर्माण झाला आहे.
कोस्टल वे, ग्रीन फिल्ड वे मुळे विकासाची वाट होणार प्रशस्त
कोस्टल वे व नियोजित असलेला ग्रीन फिल्ड वे हे मार्ग कोकण पर्यटनाची वाट नक्कीच प्रशस्त करतील. आगामी दशकात रस्ते मार्गावर झालेल्या गुंतवणुकीचे द़ृष्य परिणामही दिसतील. पण त्यासाठी कृती आवश्यक आहे. जगास हेवा वाटणारे कोकण केवळ घोषणा देऊन होणार नाही, त्यासाठी कामही करावे लागणार आहे.