पाथर्डीत गालबोट; आ. राजळेंवर दगडफेकPudhari
Published on
:
21 Nov 2024, 4:41 am
Updated on
:
21 Nov 2024, 4:41 am
Pathardi News: शिरसाठवाडी मतदान केंद्रावर वाद झाल्याचे समजात आ. मोनिका राजळे तेथे पोहचल्या. मात्र जमावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या दिशेने दगडफेक केली. जमावाचा आक्रमकपणा पाहून कार्यकर्त्यांनी आ. राजळे यांना शाळेच्या खोलीस सुरक्षितपणे बसविले. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांचा लवाजमा घटनास्थळी पोहचला. दोन तासांनंतर पोलिसांनी त्यांच्याच वाहनातून आ. राजळे यांना सुरक्षितपणे पाथर्डीत पोहचविले.
दरम्यान घटनेची माहिती कळताच राजळे समर्थकांनी रस्त्यावर उतरत पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौकात रास्ता रोको केला. जमावातील तरुणांचे भवितव्य बरबाद होवू नये, यासाठी पोलिसात तक्रार न देण्याची भूमिका आ. राजळे यांनी घेतल्याने पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान आ. राजळे समर्थकांनी निषेध म्हणून आज पाथर्डी बंदची हाक दिली आहे.
पाथर्डी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर शिरसाठवाडी गाव आहे. या गावात मतदान संपल्यानंतर दोन गटात वाद सुरू असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांना समजली. आ. राजळे शिरसाठवाडीत पोहचल्या तेव्हा शेकडोंचा जमाव तेथे होता. जमावाने आ. राजळे यांच्या विरोधात घोषणबाजी सुरू केली.
पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावापुढे मोजक्या पोलिसाचे काही चालले नाही. त्यानंतर जमावाने आ. राजळे यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. जमावाचा आक्रमकपणा पाहून कार्यकर्त्यांनी आ. राजळे यांना मतदान केंद्रातील खोलीत सुरक्षितपणे बसविले.
दरम्यान घटनेची माहिती कळताच पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे फौजफाटा घेवून तेथे पोहचले. पोलिसांची कुमक पाहून अनेकांनी काढता पाय घेतला तर जमावातील काहींना पोलिसांनी पिटाळून लावले. त्यानंतर पोलीस अधीक्षक सुनील पाटील यांनी त्यांच्याच वाहनातून आ. राजळे यांना मार्ग बदलून पाथर्डीत पोहचविले.
आ. राजळेंच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष
मतदारसघातील संवेदनशील केंद्राची नावे असलेले पत्र आ. मोनिका राजळे यांना पोलिसांना दिले होते. सकाळपासूनच आ. राजळे यांना अनेक गावात ठरवून विरोध करण्यात आला. अनेक ठिकाणी आ. राजळे यांची जाणीवपूर्वक अडवणूक करण्यात आल्याचा आरोप आ. राजळे यांना पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्याशी बोलताना केला.
कोरडगाव चौकातही हाणामारी
रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरातील कोरडगाव चौकामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला. मतदान प्रक्रियेदरम्यान टाकळीमानुर येथे भाजप व राष्ट्रवादीचे(एसपी) कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळले.
पोलिसांसह कार्यकर्ते जखमी
या घटनेनंतर आ. मोनिका राजळे यांना आश्रू अनावर झाले. जीवघेण्या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या. दगडफेकीत आ. राजळे यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यात पोलिसांसह कार्यकर्त्यांनाही मार लागला. तेही जखमी झाल्याचे समजते.
जीव मुठीत धरून अंधारात काढला तासभर
आ. मोनिका राजळे ज्या मतदान केंद्राच्या खोलीत बसल्या होत्या. तेथे मतदान प्रक्रिया संपलेली होती. आ. राजळे खोलीत पोहचताच तेथील वीज पुरवठा खंडीत झाला. रात्रीच्या अंधारात आ. राजळे तेथे जीव मुठीत धरून बसल्या होत्या. नंतर तेथे पोहचलेल्या पोलीस अधिकार्यांनी आ. राजळे यांना सुरक्षितपणे बाहेर काढत पाथर्डीत पोहचविले.