भुजबळ यांच्या प्रचारार्थ गुरूवारी येवला तालुक्यातील नगरसूल येथे जाहीर सभा पार पडली. pudhari
Published on
:
15 Nov 2024, 6:15 am
Updated on
:
15 Nov 2024, 6:15 am
येवला/नगरसूल : मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून येवल्याला पाणी आपण पोचवले आहे. आपण केवळ आपण यावर थांबणार नाही तर पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून ७ टीएमसी हून अधिक पाणी आपण येवल्यासोबतच मराठवाड्यापर्यंत नेऊ, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला लासलगाव मतदार संघातील महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ गुरूवारी येवला तालुक्यातील नगरसूल येथे जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले की, ज्यांनी मला विकासासाठी येवल्यात आणले. निवडून आल्यावर सर्व कारभार त्यांच्याच हातात होता. विकासाची कामे सुरु झाली होती. तरी देखील लगेचच पाच वर्षांनंतर लगेचच माझ्या विरोधात निवडणूक लढविली. यामागे त्याची भूमिका नेमकी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकासाला कुठलीही मर्यादा नसते त्यामुळे यावर विश्वास ठेऊन येवलेकरांनी मला पुन्हा एकदा निवडून दिले. त्यानंतर मतदारसंघात विकासाची अनेक कामे आपण करू शकलो, असे त्यांनी सांगितले. मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे आपण मार्गी लावली. आता येवला ते पिंपळस तसेच लासलगाव विंचूर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊन गती मिळणार आहे. कोरोनाच्या काळात मतदारसंघा बरोबरच जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करून कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करून देण्यात आली. येवल्यात सुमारे १७ एकर जागेवर भव्य प्रशासकीय संकुल उभे केले.
येवल्यात पैठणी व्यवसायाला चालना देण्यासाठी पैठणी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले. पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे २००४मध्ये चार दुकाने असलेल्या येवल्यात आज पैठणीची पाचशेहून अधिक दुकाने आहेत. जगभरातून लोक आज येवल्यात खरेदीसाठी येतात. त्यामुळे येवल्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. येवल्याच्या मुक्तीभूमिचा विकास, शिवसृष्टी, नाट्यगृहाची निर्मिती, अहिल्याबाई होळकर घाटाची निर्मिती अशी अनेक कामे केले असल्याचे त्यांनी सांगितले.