गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्था GBSची मोठी दहशत माजली असून पुण्यात या आजाराचे बरेच रुग्ण पहायला मिळाले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही जीबीएसचे बरेच रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण होते. मात्र आता यासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येतील वाढ केवळ पुण्यापुरती मर्यादित आहे. पुण्यातही सिंहगड रस्ता परिसरातच या आजाराचा उद्रेक दिसून येत आहे. राज्यात इतरत्र जीबीएस रुग्णांची संख्या नेहमीएवढीच असून, त्यात वाढ झालेली नाही. यामुळे पुढील काळात पुण्यातील जीबीएस व्यवस्थापनावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे,’ असे शीघ्र प्रतिसाद पथकाने सोमवारी स्पष्ट केले.
जीबीएसच्या पाच रुग्णांची वाढ
जीबीएसच्या 5 रुग्णांची वाढ झाली असून ही रुग्णसंख्या 163 वर पोहोचली आहे. जीबीएसच्या संशयित रुग्णांपैकी 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, 86 समाविष्ट गावातील, 18 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील तर आठ इतर जिल्ह्यातील आहेत.
जीबीएस रुग्णसंख्या वयोगट – रुग्ण
० ते ९ – २४
१० ते १९ – २२
२० ते २९ – ३५
३० ते ३९- २०
४० ते ४९ – १८
५० ते ५९ – २५
६० ते ६९ – १४
७० ते ७९ – २
८० ते ८९ – ३
एकूण रुग्ण – १६३
पिंपरी पालिका आयुक्ताचं दुर्लक्ष? जीबीएस रुग्णांच्या घरातील पाण्याच्या दोन अहवालांनी मोठा संभ्रम.
दिवसेंदिवस जीबीएस फोफावत असल्यानं शुद्ध पाण्याबाबत सगळेच गांभीर्यानं विचार करत आहेत. अशातच पिंपरी चिंचवड शहरात तेरा ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल समोर आला अन एकच खळबळ उडाली. वैद्यकीय विभागाने जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील पाण्याच्या नमुने घेतले अन त्याचं परीक्षण राज्य आरोग्य प्रयोगशाळेतून करुन घेतलं होतं. मात्र पुन्हा त्याच ठिकाणचे नमुने पाणी पुरवठा विभागाने घेतले. ज्यातून वैद्यकीय विभागाचा अहवाल चुकीचा असल्याचं अन सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला. या दोन अहवालांमुळं पालिकेच्या वैद्यकीय आणि पाणी पुरवठा विभागातील समन्वयाचा अभाव दिसून आला. दुसरीकडे या दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानायचा अन खोटा कोणता? असा मोठा संभ्रम शहरवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. यानिमित्ताने पालिका आयुक्त शेखर सिंह यांचं या गंभीर बाबीकडे लक्ष नव्हतं का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात जीबीएसचे आज पर्यंत एकूण 18 रुग्ण आढळून आले तर 6 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, मात्र 11 रुग्णांपैकी दोन रुग्ण व्हेंटिलेटर आहेत
वयोगटानुसार रुग्णांचा तपशील
0 ते 9- 4 10 ते 19-1 20 ते 29-2 30 ते 39-2 40 ते 49-2 50 ते 59-4 60 ते 69-2 70 ते 79-1