Published on
:
31 Jan 2025, 11:45 pm
Updated on
:
31 Jan 2025, 11:45 pm
सातारा : पुणे, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ आजाराने शिरकाव केल्याची भीती आहे. जिल्ह्यात या आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सातारा शहरात 3 तर कराड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. जीबीएसचा शिरकाव होण्याच्या धास्तीने घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, चारही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.
पुणे शहरात ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असताना सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ‘जीबीएस’चे चार रुग्ण आढळून आले आहेत. यातील 9 वर्षीय मुलावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला मंगळवारी दि. 28 रोजी उपचारास दाखल केले आहे. सातार्यातील एका खासगी रुग्णालयात दोघांना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यात 72 वर्षीय वृद्ध व 69 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्या दोघांच्या हिस्ट्री तपासणीचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. तर कराड येथे 9 वर्षीय मुलगीला लागण झाल्याने तिला मंगळवार दि. 28 रोजी उपचारास दाखल केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये ‘जीबीएस’च्या रुग्णांवर देखरेख तसेच योग्य उपचार होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक रुग्णांवर उपचार करत आहे. आढळून आलेले ‘जीबीएस’चे हे रुग्ण पर जिल्ह्यातून आले असावेत असे वैद्यकीय अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे माहिती घेण्याचे काम सुरू आहे. असेही वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
रुग्ण ठणठणीत; आजाराची भीती नको
या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.