डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेतून स्वाभिमान जागवला- प्रा. मेश्राम, संगाबा विद्यापीठामध्ये गोविंदाजी खोब्रागडे स्मृती व्याख्यानमाला
2 hours ago
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेतून स्वाभिमान जागवला, असे प्रतिपादन नागपूर येथील वक्ते प्रा. रणजित मेश्राम यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने स्व. गोविंदाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्रमुख पाहुणे भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेशसिंह कुशवाह, रजनी खोब्रागडे, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांची उपस्थिती होती. प्रा. मेश्राम पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून जागरण आणि प्रबोधन केले. राष्ट्रजागृती आणि स्वातंत्र्यासाठी देशात आंदोलने झालीत. परंतु, डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता याहून वेगळी होती. सार्वजनिक चळवळीची पायाभरणी पत्रकारितेतून केली. आंबेडकर यांनी प्रथमत: मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. या पाक्षिक सुरू करण्यामागील पार्श्वभूमीही त्यांनी सांगितली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेबांची पत्रकारितेची स्पंदने आणि त्यांची दूरदृष्टी वेगळी होती. अग्रलेख, स्तभांमधून त्यांनी आरोपांवर सडेतोड उत्तरे दिलीत आणि त्यांच्या कष्टाला पत्रकारितेनेही साथ दिली. गावोगाव जागृत झाले, माणसे उभी झालीत. विचार जीवंत ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून माणसे उभी केलीत. १९२४ मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाला जागृत केले. प्रत्येक आरोपांना त्यांनी चोख उत्तर दिले. गोलमेज परिषदेतही डॉ. बाबासाहेबांनी जनतेचा खरा आवाज उठवला. त्यावेळीही त्यांची पत्रकारिता भक्कमपणे उभी राहिली. १९३७ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून निवडणूकही लढवली आणि आपले प्रतिनिधी निवडून आणले. हे सर्व डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेमुळे घडले, असेही प्रा. मेश्राम म्हणाले. तसेच डॉ. राजेशसिंह कुशवाह यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, की बंदुकीपेक्षाही जास्त ताकद पत्रकारितेत आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन, शिक्षण आणि जागृती होते. आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा वापर होत आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेमधून समृद्ध, सशक्त व संपन्न असा भारत निर्माण होईल, असेही कुशवाह यांनी सांगितले. तत्पूर्वी, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. गोविंदा खोब्रागडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रज्वलन केले. त्यानंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन विनोद नितळे यांनी केले, तर आभार प्रा. अरुण रौराळे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भी. र. वाघमारे, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्षातून पत्रकारिता जोपासली. ध्येयासाठी त्यांनी संघर्ष केला. पत्रकारिता पुढे नेली. केवळ बहुजनांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी त्यांनी पत्रकारिता समृद्ध केली. प्रसारमाध्यमे समाजाचा आरसा आहेत. नि:स्पृह आणि परखड पत्रकारिता असावी. पत्रकारितेतून डॉ. बाबासाहेबांनी संघर्षाची वाट दाखवली, असेही कुलगुरू मिलिंद बारहाते यांनी म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी पत्रकारिता समृद्ध केली : कुलगुरू
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)