टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात शुक्रवारी 31 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात 15 धावांनी विजय मिळवला. पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडला 182 धावांचा पाठलाग करताना 166 धावांपर्यंतच पोहचता आलं. टीम इंडियाने या विजयासह मालिका जिंकली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या दोघांनी केलेल्या प्रत्येकी 53 धावांच्या जोरावर 181 पर्यंत मजल मारली. मात्र त्याआधी टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. टीम इंडियाने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावले. कर्णधार सूर्यकुमारने विजयानंतर या मुद्द्यावरुन प्रतिक्रिया दिली.
इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये व्हीझामुळे लटकलेल्या साकीब महमूद याचा समावेश केला. या साकीबने त्याच्या कोट्यातील पहिल्या आणि टीम इंडियाच्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये धमाका केला. साकीबने टीम इंडियाला एका ओव्हरमध्ये 3 झटके दिले. साकीबने पहिल्या, दुसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. साकीबने संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या विस्फोटक त्रिकुटाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
संजू फक्त 1 धाव करुन मैदानाबाहेर गेला. तर तिलक आणि सूर्या या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियाने टी 20i क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तिघेही आऊट झाल्याने टीम इंडियाची 12-0 वरुन 12-3 अशी स्थिती झाली.
कॅप्टन सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सूर्यकुमारने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. “एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावणं फार वाईट होतं”, असं सूर्याने सांगितलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा (कनकशन सब्स्टीट्यूट)
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.