माध्यमिक शिक्षक सोसायटीpudhari
Published on
:
20 Jan 2025, 10:47 am
Updated on
:
20 Jan 2025, 10:47 am
तज्ज्ञ संचालक म्हणून प्रा. कचरे यांची झालेली निवड, सेवानिवृत्तीनंतरही पाच संचालकांनी न सोडलेले सभासदत्व, नोकर भरती, प्रमोशन, कर्ज देण्यास टाळाटाळ अन् संस्थेतील एकाधिकारशाही, इत्यादी आरोपामुळे चर्चेत असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटी 2025 -29 साठी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम लागला आहे. लवकरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने सत्ताधारी सत्ता कायम ठेवण्यासाठी तर विरोधक सत्ता काबीज करण्यासाठी तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटी ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य सहकारी संस्था आहे. संस्थेकडे 713 कोटींच्या ठेवी आहेत. 1256 कोटींचे खेळते भांडवल आहे. त्यामुळे संस्थेचे संचालक व पुढे चेअरमन होण्याचे नेहमीच अनेक इच्छुकांचे स्वप्न राहिलेलं आहे. गेल्या निवडणुकीत पुरोगामी आणि परिवर्तन या दोन मंडळात 21 जागांसाठी चुरशीची लढत झाली.
10203 सभासद मतदार मतदानासाठी पात्र होते. निवडणुकीत प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या पुरोगामीचे 17 संचालक निवडून आल्याने सलग तिसर्यांदा सत्ता त्यांच्याच ताब्यात राहिली. तर विरोधात आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडके यांच्या परिवर्तन मंडळाला चार जागा मिळाल्याने सत्तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. प्राध्यापक कचरे यांच्या मार्गदर्शनात आज संस्थेचा कारभार सुरू आहे. मात्र या कारभारावर विरोधकांनी वेळोवेळी ताशेरे ओढलेत, यात प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतरही पाच संचालकांनी सभासदत्व सोडलेली नाही हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे.
प्राध्यापक कचरे हे सेवानिवृत्त झाले, तरीही बँकेचा कारभार अप्रत्यक्षरीत्या तेच हाकत आहे, चेअरमन, व्हायचंअरर्मन हे फक्त नावाला आहेत, असे आरोप होत आहेत, याशिवाय नोकर भरती, जवळच्या लोकांना पदोन्नत्या, आर्थिक अनियमित्ता इत्यादी बाबींवरूनही विरोधक या पाच वर्षातील सर्वसाधारण सभांमध्ये सत्ताधार्यांवर अक्षरश तुटून पडलेले दिसले. गेल्या आठवड्यातच पारनेर येथील एका कार्यक्रमाच्या कोन शिलेवरून प्राध्यापक कचरे यांचे नाव हातोडीने फोडून विरोधकांनी त्यांच्या तज्ञ संचालक या पदालाच आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे येणारी निवडणूक ही प्रतिष्ठेची व चुरशीची होणार याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान माध्यमिक शिक्षक सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे. तत्पूर्वी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 तारखेपर्यंत हरकती आहेत. हरकती नसल्यास अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीत माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक लागणार हे नक्की आहे. प्रारूप मतदार यादीनुसार मतदानासाठी 9154 सभासद पात्र आहेत, 9 फेब्रुवारी 2023 च्या यादीनुसार ही सभासदांची संख्या गृहीत धरण्यात आली आहे. उपनिबंधक गणेश पुरी हे स्वतः हा कार्यक्रम राबवत आहेत. दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. प्रत्येक तालुक्यातून इच्छुकांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. पक्षश्रेष्ठींकडूनही तुल्यबळ व ’सक्षम’ उमेदवारांची शोधा शोध सुरू झाली आहे. त्यामुळे माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांचे राजकारण आता थंडीतही तापताना जाणवत आहे.
सभासद माफ करणार नाहीत : बोडखे
प्राध्यापक कचरे यांना ज्यांनी राजकारणात आणले, त्या भोसले यांचे सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द करण्याचे ठराव करणारे स्वतः कचरे हेच होते, त्यांनी 30 डिसेंबर 1998 रोजीच्या बैठकीत असा ठराव घेतला होता, मात्र आपल्या सेवानिवृत्तीनंतर स्वतःचे सभासदत्व कायम ठेवून सभासदांचा विश्वासघात करण्याचं काम कचरे यांनी केले आहे. निवडणुकीत सभासद त्यांना जागा दाखवून देतील, असा विश्वास विरोधी मंडळाचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी व्यक्त केला.
राहुरीच्या कार्यक्रमातून राजकीय कुरघोड्या
पारनेरमध्ये कोनशिलेवरील ‘ते’ नाव फोडल्याची घटना ताजी असताना शनिवारी राहुरीत झालेल्या संस्थेच्या सेवानिवृत्तांचा व गुणवंत पाल्यांच्या सन्मान कार्यक्रमात अक्षरशः दोन पत्रिका झापल्याचे दिसले. पत्रिकेतून नावे छाटली गेली, याशिवाय शेवटी भाषण कोणी करायचे, याचे मंचावरच राजकीय नाट्यही सभासदांनी पाहिले. तर आपले भाषण संपल्यानंतर व्यासपीठ सोडणारे ‘नेते’ही दिसले. तसेच नेत्यांची भाषणे गुणगौरवाऐवजी आरोपांचे झाल्याने कार्यक्रमाला निवडणुकीची झालर लागल्याचे पहायला मिळाले.