Published on
:
24 Nov 2024, 1:10 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:10 am
मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मैदान महायुतीने मारले असून महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेले निकाल व कल यानुसार महायुतीने 288 जागांपैकी 231 जागा जिंकल्याचे चित्र असून, राज्यात महायुतीची त्सुनामीच आली आहे. यात मविआचा पार धुव्वा उडाला आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी यावेळी राज्यात केली असून, 133 जागांवर भाजप विजयी होण्याच्या मार्गावर आहे. भाजपने 149 जागा लढवल्या होत्या. विशेष म्हणजे 2014 च्या मोदी लाटेतही भाजपला इतक्या जागा जिंकता आल्या नव्हत्या. यावेळी महायुतीअंतर्गत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 81 जागा लढल्या. त्यापैकी 57 जागांवर शिंदे शिवसेना विजयी झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 59 उमेदवार रिंगणात उतरविले होते. यापैकी 41 जागांवर विजय मिळाला.
राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच प्रमुख स्पर्धा होती. मात्र सत्तेसाठी आवश्यक 145 चा आकडा तर दूर उणेपुरे अर्धशतकही महाविकास आघाडीला गाठता आलेला नाही. महाविकास आघाडीला 47 जागांमध्ये गुंडाळण्यात महायुती यशस्वी ठरली. काँग्रेसने 101 जागा लढल्या आणि केवळ 15 जागांवर काँग्रेस विजयी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना (ठाकरे) गटाने 95 जागा लढल्या आणि केवळ 20 जागांवरच ठाकरे गट विजयी झाला. राष्ट्रवादी(शरद पवार) गटाने 86 जागांवर निवडणूक लढली. मात्र त्यांना केवळ 10 जागाच जिंकता आल्या. विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदही त्यामुळे विरोधी पक्षातील घटक पक्षांपैकी कुणालाही मिळणार नाही, असे संकेत आहेत.