Published on
:
18 Nov 2024, 12:15 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:15 am
कणकवली ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. सिंधुदुर्गातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये 17 उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचाराची मुदत संपणार असली, तरी छुपा प्रचार करण्यावर कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी निवडणूक कर्मचारी त्या-त्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत.
सिंधुदुर्गात कणकवली-देवगड-वैभववाडी या मतदारसंघामध्ये सहा उमेदवार रिंगणात आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात 5, तर सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले मतदारसंघात 6 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. खरी लढत ही महायुती व महाविकास आघाडीमध्ये होत असून कुडाळ व कणकवली मतदारसंघात थेट सामना पहायला मिळणार आहे. तर सावंतवाडी मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याने चौरंगी लढत होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सर्वच उमेदवार, त्यांचे पक्ष व कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार सुरू असून वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक दिवस अगोदर प्रचाराची रणधुमाळी थांबणार असून त्यानुसार सोमवार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर जाहीरपणे प्रचार होवू नये याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे.
निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अनेक नेत्यांनी सिंधुदुर्गात दौरे करून जाहीर सभा घेतल्याने रंगत वाढली आहे. आरोप-प्रत्यारोप करण्याबरोबरच आश्वासने, जाहीरनामे मांडत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जाहीर सभा संपून शेवटच्या दिवशी सोमवारी मतदारांच्या घरोघरी जावून भेटी घेत पत्रके वाटप व डमी निवडणूक यंत्र दाखवून माहिती पोहोचविण्यावर कार्यकर्त्यांची सायंकाळपर्यंत धावपळ असणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसला. अनेक नेत्यांच्या सभा घरी, कार्यालयात थांबून लाईव्ह पाहण्यावर अनेकांनी भर दिला आहे. तर अनेक उमेदवारांनी आपले रेकॉर्ड संभाषण मतदारांच्या मोबाईलवर पाठवून त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
या नेत्यांनी घेतल्या प्रचारसभा
तीनही मतदारसंघातील प्रचारामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आदींनी सभा बैठका घेतल्या. तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत आदींसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी सिंधुदुर्गात सभा बैठका घेतल्या.
आज व उद्या कंदिल प्रचार:प्रशासन अलर्ट
विधानसभेची निवडणूक नेते आणि उमेदवारांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांकडून प्रचार यंत्रणा अधिक वेगाने राबविण्यात येणार आहे. सायंकाळी जाहीर प्रचार संपल्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभरात छुप्या पध्दतीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निवडणूक यंत्रणा व प्रशासन अधिक अलर्ट राहणार आहे.
बाहेरचे मतदार आणण्यावर भर
मूळचे सिंधुदुर्गातील पण नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरच्या जिल्ह्यात अथवा मुंबई, पुणे आदी भागांत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मतदानासाठी आणण्यावर सर्वच पक्षांकडून भर दिला जाणार आहे. त्यांची वाहतूक व्यवस्था व सुविधा देण्याचे नियोजन केल्याचेही समजते. हे मतदार निर्णायक असून, त्यामुळे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढणार आहे.