बांगला देशी महिला प्रकरणात ‘त्या’ लॉजच्या मॅनेजरला अटक file photo
Published on
:
22 Jan 2025, 12:30 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:30 am
कणकवली ः कणकवली शहरात काही दिवसापूर्वी पकडण्यात आलेल्या बांगला देशी महिला प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर या प्रकरणी कणकवली पोलिसांनी गुन्ह्यामध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक नियमाचे कलम वाढवत शहरातील एका लॉज मालक आणि मॅनेजरला संशयित आरोपी केले आहे. त्यानूसार कणकवली पोलिसांनी येथील लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओमकार विजय भावे (32, रा. कळसुली-सांद्रेवाडी) याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. तर त्या लॉजचा मालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
कणकवलीत बांगलादेशी महिलांना अटक केल्यानंतर तपासी अधिकारी अनिल हाडळ यांनी याप्रकरणाचा सखोल तपास सुरु केला. कणकवलीत नेमक्या त्या कोणत्या कारणासाठी आल्या होत्या. याबाबत चौकशीत एक वेगळीच माहिती तपासात पुढे आली. त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याच्या शक्यतेवरून त्या कणकवलीत आल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याच्या कलमात वाढ करत अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिस चौकशीत पुढे आलेल्या त्या लॉजचा मालक आणि मॅनेजरच्या मागावर पोलिस होते. सोमवारी रात्री पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे यांनी जाणवली ब्रिजनजीक सापळा रचून मॅनेजर ओमकार विजय भावे याला ताब्यात घेत अटक केली. तर लॉज मालक पसार असून त्यालाही लवकरच गजाआड करणार असल्याचे अनिल हाडळ यांनी सांगितले.