‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. हा सिझन प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन केलं होतं आणि त्याचा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण यांसारख्या स्पर्धकांनी हा सिझन तुफान गाजवला होता. आता ‘बिग बॉस मराठी’चा नवीन प्रोमो नुकताच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये नव्या सिझनविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय, “ढोल-ताशाच्या गजरात सगळेच स्पर्धक बिग बॉसच्या चक्रव्यूहात शिरणार. जे चांगले वागणार, त्यांची मी वाह-वाह करणार, पण जे वाईट वागणार त्यांची मी.. सगळ्यांची वाजणार, हा सिझन गाजणार.” त्यामुळे बिग बॉस मराठीचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘कलर्स मराठी घेऊन येत आहे मनोरंजनाचा तडका, पुन्हा एकदा रितेश देशमुखसोबत होणार बिग बॉस मराठीचा खास धमाका,’ असं कॅप्शन देत हा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र कार्यक्रमाची वेळ पाहून काहींच्या मनात शंकाही उपस्थित झाली आहे.
हे सुद्धा वाचा
‘बिग बॉस मराठी’ 10 फेब्रुवारीपासून दुपारी 3 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर.. असं या प्रोमोच्या अखेरीस पहायला मिळतं. त्यामुळे दुपारी जुन्या बिग बॉस मराठीचे एपिसोड्स पुन्हा प्रसारित करणार की काय, असा प्रश्न काहींना पडला आहे. ‘नवीन सिझन की रिपिट टेलिकास्ट’ असा सवाल एकाने केला. तर ‘नवीन सिझन दुपारी 3 वाजता कसा काय सुरू होईल, रिपिट टेलिकास्ट असेल’, असा अंदाज दुसऱ्या युजरने वर्तवला आहे. ‘कोणता सिझन याचा तरी उल्लेख केला’, अशीही मागणी बिग बॉसच्या चाहत्यांनी केली आहे. त्यामुळे ही नेमकी भानगड काय आहे, हे येत्या काही दिवसांतच समजेल.