बीडमधील संतोष देशमुख मर्डर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका खूनाला वाचा फुटली आहे. महादेव मुंडे नावाच्या तरुणाचा दोन वर्षापूर्वी खून झाला होता. त्याचे आरोपी अद्यापही पकडले गेले नाहीत. मात्र हे आरोपी आकाच्या मुलाभोवती फिरत आहेत, असा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस यांनी मीडियासमोर बोलताना या नव्या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणाचीही गंभीरपणे चौकशी करण्याची मागणी धस यांनी केली आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. 22 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव दत्तात्रय मुंडे या तरुणाचा खून झाला. या खुनातील एकही आरोपी अजूनही पकडला नाही. आरोपी सुशील म्हणून आकाचा पोरगा आहे, त्याच्या आवतीभोवती हे आरोपी फिरताना दिसत आहे. मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत. ते आल्यावर त्यांच्याकडे महादेव मुंडेंबाबतचं पत्र देणार आहे. तसेच करुणा मुंडे यांच्याबाबतचंही पत्र तयार केलं आहे. गणेश मुंडे यांच्याबाबतचंही पत्र तयार आहे, असं सुरेश धस म्हणाले.
आका म्हणाले, पकडू नका
वाल्मिक देशमुख गँगने संतोष देशमुखची हत्या केली. आता महादेवची हत्या डिटेक्ट झाली. पण महादेवच्या आरोपींना अटक करण्यात आली नाही. सहाही आरोपींचे नाव डिटेक्ट झाली. त्यावेळी पीआय सानप हे आरोपीला पकडायला गेले होते. पण आकाने सांगितलं पकडू नका. राजाभाऊ फड आणि आमच्या पक्षात नसलेल्या पाचजणांना आरोपी करा असं सांगितलं. त्यावर सानप म्हणाले, मी हे करणार नाही. माझ्याकडून होणार नाही. तेव्हा आकाने त्यांना परळीतून जायला सांगितलं. त्यावर सानप यांनी मी निघून जातो, असं सांगितल्याचा दावाही, सुरेश धस यांनी केला.
सर्व हत्या परळीतील
परळीच्या तहसील कार्यालयाबाहेर महादेव मुंडेची हत्या झाली. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. ते आकाच्या मुलासोबत फिरतात. संतोष देशमुखची हत्या सोडून सर्व हत्या परळीत झाल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
कोण होते महादेव मुंडे ?
महादेव दत्तात्रय मुंडे हे मूळचे परळी तालुक्यातील भोपळा गावचे रहिवासी होते. पण 2022च्या आसपास ते आंबेजोगाईत राहायला आले. त्यांची 2023मध्ये हत्या झाली. त्यांच्या गळ्यावर आणि गालावर शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.