Published on
:
03 Feb 2025, 12:36 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:36 am
मडगाव : पंचायत क्षेत्रात येणार्या जलतरण तलावाला मंजुरी न देण्याचा ठराव बेताळभाटी पंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. रविवारी पार पडलेल्या ग्रामसभेत स्थानिकाचा अर्ज पंचायतीने फेटाळल्याच्या कृतीवरून जोरदार गोंधळ माजला. माजीमंत्री मिकी पाशेको यांनी जलतरण तलावाची परवानगी पंचायत नाकारू शकत नाही, असा मुद्दा मांडला. त्यावर खूप वेळ चर्चा झाली. त्यानंतर कोणत्याही जलतरण तलावाला मंजुरी दिली जाणार नाही, असा ठराव एकमताने मान्य करण्यात आला आहे.
बेताळभाटी पंचायतीने स्थानिकांनी जलतरण तलावासाठी केलेली मागणी फेटाळून लावली होती. मात्र गृहनिर्माण प्रकल्प तारांकित हॉटेल्स व फार्म अशा व्यवसायिक स्वरूपाच्या प्रकल्प व जलतरण तलावासाठी पंचायतीने परवाने जारी केले होते. त्याचे पडसाद रविवारच्या ग्रामसभेवर उमटले. माजीमंत्री मिकी पाशेको यांच्यासहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परवानगी नाकारण्याचा अधिकार नाही : पाशेको
माजी मंत्री पाशेको म्हणाले, जलतरण तलावाला परवानगी नाकारण्याचा अधिकार पंचायतीला नाही. खाजगी मालमत्ते बांधकाम करण्याचे अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. ग्रामसभेत कोणते प्रश्न विचारायला हवेत याचीही अनेकांना माहिती नाही. गटबाजी करून दबाव आणण्याचे काम करणार्यांनी आपल्या अशिक्षितपणाचे प्रदर्शन करू नये, असे पाशेको म्हणाले.