बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण:मुख्य आरोपीला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी; रक्त, नखे, केस, थुंकी नमुने घेऊन करणार डीएनए चाचणी

2 hours ago 1
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रसंगी आरोपी घटनास्थळावर थुंकल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोग शाळेने तेथील थुंकीचे नमुने घेतले होते. त्याच धर्तीवर आता मुख्य सराईत आरोपी अख्तर उर्फ शोएब बाबु शेख (27, रा. मंतरवाडी, हडपसर) याला अटक केल्यानंतर त्याच्या थुंकीचे नमुने घेतले जाणार आहे. त्याबरोबरच रक्त, नखे, केस याच्या नमुण्यांबरोबरच त्यांची डीएनए चाचणी देखील घेण्यात येणार असल्याने पोलिसांच्या मागणी नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी त्याला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. बोपदेव घाट येथे आपल्या साथीदाराच्या मदतीने तरुणाला झाडाला बांधुन ठेवत तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या मुख्य आरोपी अख्तरला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी गुन्हे शाखेने त्याचा साथीदार चंद्रकुमार रविप्रसाद कनोजीया (20, रा. उंड्री) या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणार्‍या आरोपीला अटक केली होती. मंगळवारी त्याच्या पोलिस कोठडीचे अधिकार अबादित ठेवून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर त्यांच्या आणखी एका फरार साथीदाराचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पीडितेच्या मित्रावर आरोपींनी हल्ला करून त्याला जखमीही केले होते. 3 ऑक्टोबरच्या रात्री पावणे अकरा वाजल्यापासून दुसर्‍या दिवशी मध्यरात्री (दि. 4) दीड वाजण्याचा सुमारास आरोपींनी सामूहिक बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार केला. आरोपी अख्तर शेख हा सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी एकत्रीतरित्या हे घृणास्पद कृत्य करून मानवी जिवीताला काळीमा फासणारी घटना आहे. त्याने हा गुन्हा करताना तरुणीला धमकाविण्यासाठी कोयत्याचा वापर केला होता. त्याच्याकडील कोयता जप्त करायचा आहे. त्याने गुन्हा करताना व गुन्हा करुन पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन त्याच्याकडून जप्त करायचे आहे. त्याने पीडित तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट, सोनसाखळी व चांदीच्या अंगठ्याही हत्याराच्या धाकाने चोरल्या आहेत. तो ऐवजही त्याच्याकडून जप्त करायचा आहे. अख्तर हा गुन्हा केल्यापासून 12 ते 13 दिवस फरार झत्तला होता. तो स्वतःची ओळख लपवून राहत होता. गुन्हा केल्यानंतर त्याने कोठे वास्तव्य केले. त्याला या दरम्यान कोणी आसरा दिला. त्याने गुन्हा करताना जे कपडे वापरले होते ते देखील त्याच्याकडून गुन्ह्यातील पुढील तपासासाठी जप्त करायचे आहे तसेच त्यांच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी (पोटेन्सी टेस्ट) करायची असल्याने त्याला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी केली. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील राहुल लोणंदकर यांनी पोलिस कोठडीला विरोध करताना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article