शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. अभिनेता सैफ अली खानवर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्याच्या घरात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील हल्लेखोराला पोलिसांनी अखेर आज अटक केलं हा धागा पकडून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते ठाण्यात बोलत होते.
आज शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ मैदानात हिंदूहृदयसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला उपस्थित राहण्यासाठी आज संजय राऊत हे ठाण्यामध्ये आले होते. त्यांनी शक्तिस्थळ येथे जाऊन आनंद दिघे यांचं दर्शन देखील घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्याच्यावर जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
समुद्रात बुडणाऱ्या त्या बोटीमधील 35 जणांचे प्राण आसिफ यांनी वाचवले, दुसरीकडे दुसऱ्या चोराला पकडणारा चेतन चौधरी आमचा शाखाप्रमुख आहे. सैफ अली खान यांच्या घरी चोरी करणारा चोर देखील ठाण्यात पकडला. ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. आता पुढील मॅच ठाण्यात जिंकायची आहे. भलेही आम्ही दोन सामने गमावले असले तरी तिसरी मॅच महापालिकेची आम्हीच जिंकणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे संकेत
दरम्यान लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संकेत दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. आज शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना तयारील लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.