रत्नागिरी : पेठकिल्ला परिसरात ना. नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा फलक लावताना कार्यकर्ते.Pudhari File Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:00 am
रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे बुधवारी रात्री काढण्यात आलेले बॅनर अखेर भाजपा, हिंदुत्ववादी संघटना आणि रत्नागिरीकरांनी एकत्र येऊन पुन्हा पेठकिल्ला येथे उभे तर केलंच; परंतु मिरकरवाड्याच्या प्रवेशद्वारावर सुद्धा ना. नितेश राणे यांचा बॅनर लावण्यात आला. या वेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम, भारत माता की जय, नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है’ या घोषणा दिल्या.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील 319 अनधिकृत बांधकामे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर 27 जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय विभागाने जमीनदोस्त केली. त्यावेळेला सक्रिय विरोध झाला नसला तरीही ही कारवाई थांबवावी, यासाठी अनधिकृत बांधकामधारकांनी बर्याच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या विरोधाला आणि त्यांच्या या मागणीला मत्स्यव्यवसाय विभागाकडून कोणतीच साथ मिळाली नव्हती. 27 जानेवारी रोजी अनधिकृत बांधकामे काढल्यानंतर गेली अनेक दशक रखडलेला हा प्रश्न ना. नितेश राणे यांनी मार्गी लावल्याबद्दल समस्त रत्नागिरीकरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या धडक कारवाईचे कौतुक केलं होतं. तर रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी त्यांना धन्यवाद देणारे आणि त्यांना हिंदू योद्धा म्हणून संबोधणारे फलक सर्वत्र झळकले होते.
असं असताना बुधवारी रात्री पेठकिल्ला येथे लावण्यात आलेला त्यांचा बॅनर अचानकपणे काढला गेला होता. सुरुवातीला ही नगर परिषदची कारवाई आहे असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु माहिती घेता या फलकाची विटंबना केल्याचा संशय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना तसेच रत्नागिरीकरांनी व्यक्त केला होता. याच्या विरोधात गुरुवारी रात्री सर्वच रत्नागिरीकर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात जमले होते. अशा समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा या वेळेला करण्यात आली होती. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा नोंदवली आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि रत्नागिरीकर पेठकिल्ला येथे जमले आणि त्यांनी ज्या ठिकाणाहून ना. नितेश राणे यांचा बॅनर काढून टाकला होता तिथेच तो बॅनर जोरदार घोषणा देत पुन्हा झळकवण्यात आला. त्यानंतर ही सर्वच मंडळी मिरकरवाड्याचा प्रवेशद्वार असलेला ठिकाणी गेले आणि तिथे ना. नितेश राणेंचे धन्यवाद मानणारा बॅनर झळकवण्यात आला.
या वेळी उपस्थितांनी जय श्रीराम, भारत माता की जय, नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी मिरकरवाडा आणि पेठकिल्ला परिसर दणाणून सोडला होता. यापुढे अशा अधिकृत कृत्याला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा प्रतिक्रिया या वेळेला भाजपा पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केल्या.