वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील यांनी 61 हजार 392 चे मताधिक्क्य मिळवत विजयाचा चौकार मारला. या निकालातून मकरंदआबाच ‘किंग’ असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. मकरंदआबांना 1 लाख 40 हजार 971 तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ. अरूणादेवी पिसाळ यांना 79 हजार 579 व महायुतीचे बंडखोर पुरूषोत्तम जाधव यांना 4 हजार 695 मते मिळाली. कायम जनतेत राहणे व किसनवीर कारखान्याला मदत मिळवून दिल्याने मकरंदआबांवर जनतेने मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली. निकाल स्पष्ट होताच आ. मकरंद पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला.
वाई एमआयडीसीमधील राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हुसेन, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सोनाली मेटकरी, तेजस्विनी पाटील, अजित पाटील उपस्थित होते.
पहिल्या फेरीतच मकरंद पाटील यांनी जी मतांची आघाडी घेतली ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. मकरंद पाटील यांनी पहिल्या फेरीत 1 हजार 282 मतांची आघाडी मिळवली. दुसर्या फेरीअखेर आ. मकरंद पाटील यांना 3 हजार 313 मतांची, तिसर्या फेरीअखेर 4 हजार 593, चौथ्या फेरीअखेर 5 हजार 933, पाचव्या फेरीअखेर 8 हजार 787, सहाव्या फेरीअखेर 10 हजार 350, सातव्या फेरीअखेर 10 हजार 743, आठव्या फेरीअखेर 14 हजार 237, नवव्या फेरीअखेर 19 हजार 157, दहाव्या फेरीअखेर 24 हजार 308, अकराव्या फेरी अखेर 29 हजार 694, बाराच्या फेरीअखेर 34 हजार 105, तेराव्या फेरीअखेर 37 हजार 739, चौदाव्या फेरीअखेर 43 हजार 272, पंधराव्या फेरीअखेर 46 हजार 611, सोळाव्या फेरीअखेर 50 हजार 272, सतराव्या फेरीअखेर 48 हजार 86, अठराव्या फेरीअखेर 51 हजार 312, एकोणीसाव्या फेरीअखेर 52 हजार 710, विसाव्या फेरीअखेर 54 हजार 764, एकवीसाव्या फेरीअखेर 56 हजार 665, बावीसाव्या फेरीअखेर 58 हजार 951, तेविसाव्या फेरीअखेर 60 हजार 49 आणि चोविसाव्या फेरीअखेर 60 हजार 872, पंचविसाव्या फेरीअखेर 61 हजार 236 मतांची आघाडी मिळाली. पूर्ण फेर्यांची मतमोजणी झाल्यानंतर आ. मकरंद पाटील हे 61 हजार 392 एवढ्या मताधिक्क्याने विजयी झाले.
अन्य 14 उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : बसपाचे विजय सातपुते यांना 1 हजार 48, वंचित बहुजन आघाडीचे अनिल लोहार यांना 1 हजार 817, रिपाइंचे अमित मोरे यांना 299, रिपब्लिकन सेनेचे उमेश वाघमारे यांना 199, रासपचे सागर जानकर यांना 498, अपक्ष अंकिता पिसाळ यांना 475, गणेश केसकर यांना 2 हजार 301, प्रमोद जाधव यांना 287, मधुकर बिरामणे यांना 281, विनय जाधव यांना 228, शितल गायकवाड यांना 459 आणि सुहास मोरे यांना 1 हजार 904 मते मिळाली. या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
आ. मकंरद पाटील यांचा विजय निश्चित होताच समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. वाईसह महाबळेश्वर व खंडाळा या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला. तिन्ही तालुक्यात आ. मकरंद पाटील हे आघाडीवर राहिले.या मतदारसंघात आ. मकरंद पाटील यांनी केलेली कोट्यवधींची विकासकामे, गावागावांत ठेवलेला जनसंपर्क कामी आला. याचबरोबर किसनवीर आणि खंडाळा या मतदारसंघातील दोन्ही कारखान्यांना उर्जितावस्था आणण्यासाठी केलेले प्रयत्न ही त्यांच्या विजयातील मोठी गोष्ट ठरली. या विजयाने मकरंदआबाच वाईचे ‘जननायक’ असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले. तर शरद पवार गटाच्या उमेदवार सौ. अरूणादेवी पिसाळ यांना उशीरा उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचारासाठी कमी अवधी मिळाला.
त्यातच वाई मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा व दुर्गम भाग जास्त असल्याने अनेक गावात अरूणादेवी पिसाळ यांना प्रचार करण्यास मर्यादा आल्या. त्यांनी आपल्या परीने ताकद लावली पण ती अपुरी पडल्याने निकालातून समोर आले आहे. बंडखोर पुरूषोत्तम जाधव यांनीही झुंज दिली असून त्यांनी लक्षणीय मते घेतली. विजयानंतर आ. मकरंद पाटील यांची गुलालाची उधळण करत वाई शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘मकरंद पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘हा आवाज कुणाचा’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. चौकातचौकात फटाके लावून गुलालाच्या उधळणीत आनंद साजरा करण्यात आला.
संकटाचा सोबती झाल्याने जननायकाचा दिग्विजय
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात नेमका उमेदवार कोण? याविषयी बरेच दिवस केवळ चर्चाच झडत होत्या. ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सौ. अरुणादेवी पिसाळ यांचे नाव पुढे आले. त्यामुळे मतदार संघात टस्सल फाईट होणार असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आ. मकरंद पाटील यांच्याविरोधकांनी केला. परंतु गेली 5 वर्षे सातत्याने मतदार संघात संपर्क ठेवून असलेले मकरंद पाटील यांच्यावरच जनतेने विश्वास व्यक्त केला. आपत्तीकाळ असो, करोना काळ असो किंवा इतर कोणतीही समस्या असो आ. मकरंद पाटील हे मतदार संघातच तळ ठोकून असायचे. त्यामुळे जनतेशी त्यांची नाळ जुळली आहे. 24 तास लोकसंपर्कात असल्याने आ. मकरंद पाटील यांचा एकतर्फी विजय झाला.