इचलकरंजी : महाविकास आघाडीकडून मतांच्या लाचारीसाठी व्होट जिहाद सुरू आहे. मतांसाठी विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करीत तळवे चाटत त्यांच्याकडून ध—ुवीकरण केले जात आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जागे झालो नाही तर पुन्हा झोपून राहावे लागेल. त्यामुळे मतांच्या धर्मयुद्धासाठी सर्वांनी एकत्रित यावे लागेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. यंत्रमागधारकांची वीज बिलाची टांगती तलवार दूर करण्यासाठी सोलरची योजना इचलकरंजीसाठी आणू. पाणी प्रश्नाचीही सरकार आल्यानंतर सोडवणूक करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ विजय निर्धार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, धर्माला विरोध करणारे लोकही आता रामकृष्ण हरी म्हणू लागल्याने भगव्याची जादू सुरू झाली आहे. मात्र साधू कोण आणि संधिसाधू कोण, हिंदुत्ववादाचा आव आणला तरी कोणाला निवडून द्यायचे हे इचलकरंजीची जनता चांगलेच जाणते. आ. आवाडे यांनी माजी आ. हाळवणकर यांची साथ लाभल्याने पावसात आता कोणी भिजलो म्हणून निवडून येणार, असे सांगत असले तरी राहुल आवाडे आपल्या सर्वांच्या साथीने मतांचा पाऊस पडून ते रेकॉर्डब—ेक मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
आ. प्रकाश आवाडे म्हणाले, विरोधकांनी केलेल्या विरोधानंतरही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कॉ. मलाबादे चौकात उभारण्यास शासनाकडून परवानगी आणली. कृष्णा पाणी योजनेलाही याच विरोधकांनी विरोध केला. 24 तास पाणी मिळावे यासाठी 100 प्रकल्प उभारले. मात्र तेही विरोधकांनी बंद पाडले. इचलकरंजीला सुळकूडचे पाणी आम्ही देऊ. त्यामुळे सर्वांगीण विकासाच्या योजना पूर्ण करण्यासाठी साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, मतदारसंघातील प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी विरोधकांचा टांगा पलटी करूया. राहुल आवाडे म्हणाले, महायुती सरकारमुळे मतदारसंघात विकासाची गंगा आली. यंत्रमागधारकांना वीज बिल सवलत मिळाल्याने मोठा फायदा झाला.यावेळी अशोक स्वामी, बाळ महाराज, अनिल डाळ्या, पुंडलिक जाधव, मिश्रीलाल जाजू, ऋषभ जैन आदींची भाषणे झाली. सभेस स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, रवींद्र माने, जवाहर छाबडा, स्वप्निल आवाडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, शहाजी भोसले आदींसह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक गर्दीची सभा; मोबाईल टॉर्चने स्वागत
थोरात चौक येथे राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या सभेच्या गर्दीचे रेकॉर्डही आजच्या सभेने तोडले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन होताच सभास्थळी उपस्थित जनसागराने मोबाईलचे टॉर्च दाखवून उत्स्फूर्त स्वागत केले. फडणवीस यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांनी आपलेही मोबाईल टॉर्च दाखवून प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने राहुल आवाडे यांना पाठिंबा देण्यात आला .