सोलापूर : ढोल ताशांचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हजारोंच्या गर्दीने ‘देवेंद्र कोठे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं..’ची घोषणा देत शहर मध्य मतदारसंघात केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली.
शहरमध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ शनिवारी रामवाडी परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस हजारोंची गर्दी लोटली होती. मधुकर उपलप वस्ती परिसरातून पदयात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी नागरिकांकडून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून, फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले. ही पदयात्रा नसून जणू विजयी यात्राच आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी नोंदवली.
जांबमुनी मोची समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या मोची समाजाच्या मेळाव्यात तीन माजी नगरसेवकांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, लक्ष्मण जाधव, विठ्ठल जाधव, किसन जाधव, नागेश गायकवाड, संतोष पवार, सरस्वती कासलोलकर, नागनाथ कासलोलकर, मोनिका कोठे, चेतन गायकवाड, शहाजी पवार, अमोल गायकवाड, दिलीप कोल्हे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
पदयात्रेचे नागरिकांनी चौकाचौकात रांगोळी रेखाटून, पुष्पवृष्टी करत स्वागत केले. अनेक ठिकाणी महिला भगिनींनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उमेदवार देवेंद्र कोठे यांचे औक्षण केले.
शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात मोची समाज नेहमी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. आता मोची समाजाचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते भाजपात प्रवेश केल्यामुळे निकाल भाजपकडे झुकला आहे.