आरोग्य विभागpudhari file photo
Published on
:
04 Feb 2025, 5:55 am
Updated on
:
04 Feb 2025, 5:55 am
शशिकांत पवार
नगर तालुका : नगर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध असलेले ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपकेंद्रांमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळावर तालुका आरोग्य अधिकारी विनोद काकडे यांनी पुढाकार घेत आरोग्य यंत्रणेचा कायापालट करीत रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मरगळ झटकून कात टाकणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील 110 गावांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक ग्रामीण रुग्णालय, 9 प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत 43 उपकेंद्र कार्यान्वित आहेत. परंतु रात्रीच्या वेळेस तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा बंद असल्याने रुग्णांची हेडसांड होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेस रुग्णांना तात्काळ सेवा मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचाही तुटवडा भासतो. रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सांधेदुखी, नायटा यासारख्या आजारांसाठी आवश्यक असणारा मलम आरोग्य केंद्रांत उपलब्ध नाही. तसेच इतरही औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना खासगी दुकानांमधून औषधे खरेदी करावी लागते.
कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तसेच वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने आरोग्य विभागाला अपुर्या मनुष्यबळाच्या सामना करावा लागतो. त्या कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. रात्रीच्या वेळी बंद असणार्या आरोग्य केंद्रांचा रुग्णांना फटका बसतो. रात्री आरोग्य केंद्र सुरू ठेवण्यासाठी महिला कर्मचारी व वैद्यकीय अधिकार्यांसाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची गरज आहे.
तालुक्यातील काही उपकेंद्रांच्या इमारतीचे निर्लेखन झाले असल्याची माहिती मिळते. उपकेंद्रांच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, त्यांच्या नूतनीकरणाची गरज आहे. अपुरे मनुष्यबळ अन् त्यातच आयुष्यमान भारत कार्डची जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचार्यांवर अतिरिक्त कामांचा ताण पडत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणार्या रुग्णांची संख्या मोठी आहे. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात जानेवारी या एकाच महिन्यात 1436 रुग्णांनी सेवा घेतली आहे. अशीच परिस्थिती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची आहे. तरी देखील रात्री रुग्णांना सेवा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. बालकांच्या लसीकरणासाठी योग्य नियोजन नसल्याचे बोलले जाते. तसेच मासिक बैठकीच्या वेळेचे वरिष्ठांकडून योग्य नियोजन होत नसल्याने त्याचा त्रास महिला अधिकारी व कर्मचार्यांना सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी विनोद काकडे यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत बदल घडवून आणत रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत मोठा बदल घडून रुग्णांना सेवा मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.
चोवीस तास आरोग्य सेवा हवी
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र रात्री चालू राहिल्यास ग्रामीणरुग्णांसाठी फायदेशीर ठरेल. रात्री अपरात्री घडणार्या अपघातांतील रुग्णांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. अशावेळी आरोग्य केंद्र चालू असल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून 24 तास सेवा मिळण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
तालुका आरोग्य विभाग प्रत्येक उपक्रमात कायम अव्वल ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तीस वर्षांपुढील सर्वांना स्क्रीनिंग, उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या उपचाराखाली आणले. कर्करोगाचे रुग्ण शोधून मोफत उपचार केले. महात्मा फुले योजनेत तालुका अव्वल स्थानी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेस कर्मचार्यांचे नियुक्ती केली आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात आरोग्य विभागाची कामगिरी उल्लेखनीय आहे.
डॉ. विनोद काकडे, तालुका आरोग्य अधिकारी