मल्टिवर्स – सोर्स कोड

2 hours ago 1

>> ड़ॉ  स्ट्रेंज

अचाट कल्पनाशक्तीचा अनुभव

ख्रिस्तोफर नोलान, स्पिलबर्ग, जेम्स कॅमरुनसारख्या दिग्दर्शकाच्या मांदियाळीतील एक दिग्दर्शक डंकन जोन्स. त्याचा ‘सोर्स कोड’ हा अप्रतिम चित्रपट अचाट कल्पनाशक्तीने भरलेला आहे. आठ मिनिटांच्या टाइम लूपमध्ये वारंवार फिरणारी या चित्रपटाची कथा पडद्यावर साकार होताना बघणे हा एक थक्क करणारा अनुभव आहे.


साय फाय चित्रपट हे तुम्हाला कायम थक्क करतात, पण काही साय फाय चित्रपट असे असतात, जे तुम्हाला पूर्णपणे गुंतवून टाकतात. अगदी चित्रपटाच्या शेवटानंतरदेखील आपण बुचकळ्यात पडलेले असतो, नक्की आपण काय बघितले याबद्दल संदिग्ध असतो. असा चित्रपट पुनः पुन्हा पाहिल्यानंतर मग हळूहळू उमगू लागतो आणि एकदा त्याच्या रहस्याची उकल झाली की, आपल्या समोर मानवी कल्पनाशक्तीचा एक चमत्कार साकार झालेला असतो. ख्रिस्तोफर नोलान, स्पिलबर्ग, जेम्स कॅमरुन यांनी असे एकसे बढकर एक चित्रपट दिलेले आहेत. त्याच यादीत डंकन जोन्स या दिग्दर्शकाच्या ‘सोर्स कोड’ या अप्रतिम चित्रपटाचा समावेश करावा लागेल. आठ मिनिटांच्या टाइम लूपमध्ये वारंवार फिरणारी कथा पडद्यावर साकार होताना बघणे हा एक थक्क करणारा अनुभव आहे.

कॅप्टन कोल्टर स्टीवन्स हा अमेरिकन सैन्यातला धाडसी पायलट. हा पायलट एकदा झोपेतून जागा होऊन डोळे उघडतो तेव्हा तो चक्क शिकागोला जाणाऱया एका ट्रेनमध्ये बसलेला असतो. कोल्टरची शेवटची जी आठवण असते त्यानुसार तो अफगाण युद्धात लढत असतो. भर युद्धात लढता लढता थेट शिकागोच्या ट्रेनमध्ये आपण कसे पोहोचलो हे त्याला काही केल्या स्मरत नसते. अशातच एक सहप्रवासी महिला क्रिस्टिना त्याला सीन नावाने हाक मारते आणि तो गोंधळतो. अशातच बाथरूममध्ये गेल्यावर त्याला आपले फक्त नाव बदलले नाही तर शरीरदेखील बदलले असल्याचे लक्षात येते आणि तो चक्रावतो. त्याला त्याच्या खिशात सीन नावाच्या इसमाचे ओळखपत्रदेखील सापडते, ज्याच्या शरीरात तो वावरत असतो. हा गोंधळ सोडवायचा काही प्रयत्न कोल्टर करणार तोच गाडीत एक जोरदार बॉम्बस्फोट होतो आणि त्याची शुद्ध हरपते.

शुद्धीवर आलेला कोल्टर एका बंद चेंबरमध्ये असतो. त्याची भेट तिथे कॅप्टन गुडविन या महिलेशी होते आणि त्याच्या आयुष्यातला एक वेगवान, अचाट कल्पनाशक्तीने भरलेला आणि थक्क करणारा प्रवास सुरू होतो. इथे त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात, तर काही नवे प्रश्न समोर उभे राहतात. शिकागोमध्ये एका ट्रेनमध्ये जोरदार बॉम्बस्फोट झालेला असतो आणि सर्व प्रवासी मारले गेलेले असतात. ज्याने कोणी हा हल्ला घडवून आणला आहे, तो अशा प्रकारचे अजून हल्ले भविष्यात घडवणार याबद्दल तपास यंत्रणांना शंका नसते. आता या गुन्हेगाराला रोखायचे कसे हा मुख्य प्रश्न असतो.

आता शास्त्रज्ञ एक प्रोग्राम तयार करतात. या प्रोग्राममध्ये त्या दिवशी ट्रेनमधून प्रवास करणाऱया काही लोकांच्या स्मृती साठवून त्याद्वारे एक आभासी जगाची (इमॅजनरी वर्ल्ड) निर्मिती करायची आणि त्या आभासी जगात प्रत्यक्ष जगातून (रियल वर्ल्ड) एखाद्या व्यक्तीला पाठवायचे व गुन्हेगाराचा माग काढायचा असा प्लॅन ठरलेला असतो. या प्रोग्रामचे नाव म्हणजे सोर्स कोड. कोल्टर आता या प्रोग्रामचा एक हिस्सा बनलेला असतो. या प्रोग्राममध्ये कोणत्याही व्यक्तीच्या शेवटच्या फक्त आठ मिनिटांच्या स्मृती साठवून ठेवता येणे शक्य असते. कोल्टर त्या जगात प्रवेश करून हल्ला रोखू शकणार नसतो, पण तो गुन्हेगाराचा माग काढण्यास यशस्वी ठरल्यास भविष्यातले संभाव्य हल्ले रोखण्यास मदत होणार असते.

भूतकाळ बदलण्यास अक्षम असलेल्या कोल्टरकडे प्रत्येक वेळी फक्त आठ मिनिटांचा कालावधी असतो आणि या कालावधीत त्याला गुन्हेगाराला शोधायचे असते. कोल्टर सर्वतोपरी मेहनत घेतो आणि एका टाइम लूपमध्ये त्याला बाथरूममध्ये ठेवलेला बॉम्बदेखील सापडतो. ज्याने कोणी बाथरूमचा वापर केलेला असतो, त्यापैकी एकाने हा बॉम्ब ठेवला हे निश्चित असते. कोल्टर आता या दिशेने तपासाला सुरुवात करतो. तपास करताना तो एका अशा वळणावर येतो, जिथे त्याला कळते की, बाथरूम वापरणाऱया मोजक्या लोकांत तो स्वत अर्थात तो ज्याच्या शरीरात असतो तो सीनदेखील सामील आहे. सीनचा संशय येऊ लागलेला कोल्टर आता सीनच्या सामानाची तपासणी करायला सुरुवात करतो आणि कथानक एक वेगळे वळण घेऊ लागते.

सीन नक्की कोण असतो? कोल्टर रहस्याची उकल करण्यात यशस्वी होतो का? ते रहस्य नक्की काय असते? सोर्स कोड नक्की कसा काम करत असतो? या सर्व प्रश्नांची रंजक उत्तरे पडद्यावर पाहण्यात जो आनंद आहे तो नक्की चुकवू नका.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article