महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस हा सर्वाधिक धुमधडाक्याचा ठरला. प्रत्येक पक्षाचे नेते रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शेवटच्या तासात बारामतीत सभा पार पडली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील शेवटची प्रचारसभा ही बारामतीतच पार पडली. शेवटच्या तासाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा पार पडल्या. या सभांमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून विरोधकांवर शरसंधान साधण्यात आलं. प्रत्येक पक्षाच्या सभेमुळे निवडणुकीत प्रचंडल रंगत आलेली बघायला मिळाली. अखेर आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता अतिशय कडेकोटपणे आचारसंहितेचं पालन राजकीय पक्षांना करावं लागणार आहे. कारण संध्याकाळी सहा वाजेपासून कोणत्याहीप्रकारे प्रचार केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी आता येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला निकाल समोर येणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचं जास्त लक्ष लागलेलं होतं. कारण गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या ते पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनतेची त्या घटनांवर प्रतिक्रिया काय आहे? याचं उत्तर या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. अर्थात त्या घटनेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला सपाटून मार खावा लागला. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांची घोषणा केली. विशेष म्हणजे दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेचे पैसे आले आहेत. या योजनेमुळे महायुती सरकारची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वातावरण थोडं वेगळं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष बघायला मिळाला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सभा घेतल्या. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यभरात सभा घेतल्या. या निवडणुकीत शरद पवार अतिशय आक्रमक बघायला मिळाले. त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी संपूर्ण राज्य पिंजून काढत झुंजारपणे प्रचार केला.
हे सुद्धा वाचा
ठाकरे भावांमध्ये टोकाची टीका
या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधूंमध्ये टोकाची टीका-टीप्पणी बघायला मिळाली. राज ठाकरे यांच्याकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. राज ठाकरेंच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांचा पक्षाचा गुजरात नवनिर्माण सेना असा उल्लेख करण्यात आला.