महाराष्ट्राच्या नेमबाजांचा पदकांवर निशाणा; पार्थ मानेला पदार्पणातच सुवर्ण, रुद्रांक्ष पाटीलला रौप्य तर किरण जाधवला कांस्य

3 hours ago 1

मराठमोळय़ा नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य व कांस्य पदकाच्या कमाई करीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्रिशूल शूटिंग रेजवर महाराष्ट्राची पताका फडकवली. रंगतदार झालेल्या 10 मीटर एअर रायफल्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ मानेने सोनेरी वेध घेतला, तर जागतिक सुवर्णपदक विजेता रुद्रांक्ष पाटीलने रुपेरी यश संपादन केले. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारा सातारा जिह्यातील किरण जाधवला कांस्य पदक मिळाले. आजच्या जोरदार कामगिरीनंतर महाराष्ट्राने 7 सुवर्णांसह 32 पदके जिंकत पदकतालिकेत चौथे स्थान संपादले आहे. 9 सुवर्ण पदकांसह तूर्तास मणिपूरने अव्वल स्थान काबीज केले आहे.

नेमबाजीत आज 17 वर्षीय पार्थने 252.6 गुण, रुद्रांक्षने 252.1 गुण, तर किरणने 230.7 गुणांची नोंद करीत तिन्ही पदके जिंपून दिली. पार्थ हा मूळचा सोलापूरचा खेळाडू असून गेले चार वर्षे तो सुमा शिरूर यांच्या पनवेल येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर मी फक्त सुवर्णपदक जिंकण्याचाच विचार केला होता. त्या दृष्टीनेच सुरुवातीपासूनच मी अचूक नेम कसा साधला जाईल याचे नियोजन केले होते. सुदैवाने माझ्या नियोजनानुसारच घडत गेले. या स्पर्धेत प्रथमच भाग घेताना सुवर्ण पदक मिळवता आले याचा आनंद मला खूप झाला आहे, असे पार्थ याने सांगितले.

ऋषभ दास, मिहीर आंब्रे यांना सुवर्ण

जलतरणात आज महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांचा चौकार ठोकला. ऋषभ दासने 200 मीटर बॅकस्ट्रोक्स प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तर मिहीर आंब्रेने 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सोनेरी यश संपादन केले. प्रतिष्ठा डांगी हिने महिलांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक्स प्रकारात रौप्यपदक, तर अवंतिका चव्हाणने 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये रुपेरी यश संपादन केले. ऋषभने 2 मिनिटे 3.34 सेपंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. मिहीरने 24.29 सेपंदांत बाजी मारत सुवर्ण पटकावले. प्रतिष्ठाला दोन सेपंदाच्या फरकाने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अवंतिकाने 27.28 सेपंद वेळेसह रौप्य पदकाला गवसणी घातली.

रग्बीमध्ये महाराष्ट्र पुरुष संघाला रौप्य, महिलांना कांस्य

रग्बी सेव्हनमध्येही महाराष्ट्राने खाते उघडून 1 रौप्य व 1 कांस्य पदकाची कमाई केली. अंतिम लढतीत दिल्लीकडून पराभूत झाल्याने पुरुष संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिला संघाने दिल्लीला नमवून कांस्य पदक खेचून आणले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात हरयाणाने महाराष्ट्राला 22-7 असे पराभूत केले.  महिलांच्या कांस्य पदकाच्या लढतीत महाराष्ट्राने दिल्लीवर 17-10 गुणांनी दणदणीत विजय मिळवला.

कबड्डीत महाराष्ट्राचे पुरुष साखळीतच गारद

कबड्डीमध्ये महिलांनी उपांत्य फेरीकडे वाटचाल करीत पदकाच्या आशा कायम राखल्या असल्या तरी पुरुष संघाचे मात्र साखळीतच आव्हान संपुष्टात आले आहे.  अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राचा 44-43 असा अवघ्या एका गुणाने पराभव करत धक्का दिला. महिलांच्या संघाने पश्चिम बंगालवर 30-22 अशी मात करत आपली घोडदौड कायम राखली. महाराष्ट्राकडून सोनाली शिंगटे व मंदिरा कोमकर यांनी उत्पृष्ट चढाया केल्या. रेखा सावंत हिने जोरदार पकडी करीत त्यांना चांगली साथ दिली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची हरयाणा संघाशी गाठ पडणार आहे.

खो-खो संघ जेतेपदापासून एक पाऊल दूर

महिला व पुरुष दोन्ही खो-खो संघांनी अंतिम फेरीत धडक दिली. महाराष्ट्राच्या मुली अंतिम लढतीत ओडिशाशी भिडतील. महिलांनी उपांत्य लढतीत दिल्लीचा 8 गुण आणि एक डावाने धुव्वा उडविला. पुरुष गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालची 10 गुण व 7 मिनिटे राखून दाणादाण उडवली.

पूजा दानोळेचे रुपेरी यश

कोल्हापूरच्या पूजा दानोळेने आणखी एका पदकाची कमाई करीत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद मिळवून दिले. पूजाने 60 किलोमीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. तिच्या या कामगिरीने महाराष्ट्राने रोड सायकलिंगचे विजेतेपदावर नाव कोरले. पूजाने हे अंतर एक तास 45 मिनिटे 10.590 सेपंदांत पार केले. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिला हे अंतर पार करण्यास एक तास 45 मिनिटे 10.512 सेपंद वेळ लागला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article